Uncategorized

सोलापूर जिल्हा शिवसेनेला गतवैभव आणण्यासाठी नारायण पाटलांना संधी द्यावी शिवसैनिकांचा सुर

करमाळा समाचार – सुनिल भोसले 

सोलापूर जिल्हा शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी करमाळयाचे शिवसेनेचे माजी आ.नारायण (आबा) पाटील यांची शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करावी अशी मागणी सोलापूर जिल्हा शिवसेनेतून होत आहे.

माजी आ.नारायण पाटील यांचा 2019 च्या निवडणूकीत केवळ 3 हजार मतांनी पराभव झाला होता. करमाळा तालुक्यातील जिल्हापरिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी, आदि संस्था शिवसेनेच्या ताब्यात आहेत. नारायण पाटील यांचा राजकारणात 30 वर्षाचा प्रदिर्घ अनुभव असून सरपंच पदापासून आमदार झाल्यामुळे ग्रामीण भागाची पुरेपुर माहिती त्यांना आहे. संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क असून त्यांचा फायदा पक्ष संघटनेला होवू शकतो.

पैलवानकी क्षेत्रामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यामध्ये गावा गावात त्यांची मित्रमंडळी असून येणाऱ्या काळातील नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती आदि निवडणूकात त्यांचा फायदा होवू शकतो. सध्या सोलापूर जिल्हा शिवसेनेत गोंधळाचे वातावरण असून गटबाजी फोफावली आहे. नव्या जुन्यांचा वाद मोठया प्रमाणावर वाढला आहे. यामुळे शिवसेनेचे संघटनात्मक मोठे नुकसान होत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मोठया मोठया नेते मंडळींची रांग लागलेली असताना सोलापूर जिल्हा शिवसेनेतून मात्र मोठे मोठे नेते मात्र गटबाजीला कंटाळून शिवसेना सोडून जात आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना मजबूत करण्यासाठी सर्व तळागाळातील शिवसैनिकांपासून सर्वांना एकत्रित घेवून शिवसेनेत काम करण्यासाठी नवीन नेतेमंडळींना मानाचे स्थान देवून संघटना मजबूत करणे गरजेचे असल्याचे निष्ठावान शिवसैनिकांकडून म्हटले जात आहे.

अकलुजचे डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील, सोलापूरचे वजनदार महेश कोठेसह शिवसेनेत अनेक नेतेमंडळी आली होती. पण ही नेतेमंडळीसुध्दा गटबाजीला कंटाळून पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. शिवसेनेचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे हे सुध्दा गटबाजीचे बळी ठरले असून शिवसेनेत काम करणारे जुनी मंडळी सुध्दा प्रवाहाच्या बाहेर गेलेली आहे. विद्यमान असलेले संपर्कप्रमुख आ.तानाजीराव सावंत वर्षभरापासून सोलापूर जिल्ह्यात फिरलेले नाही. 2019 च्या विधानसभा निवडणूकीत चुकीच्या पध्दतीने तिकीट वाटप झाल्यामुळे शिवसेनेचे हक्काचे चार उमेदवार पराभूत झाले.

सध्या सोलापूर जिल्हा शिवसेना पूर्णपणे विस्कळीत झाली असून याचा फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबूत होत चालली आहे. प्रशासकीय पातळीवर सुध्दा जिल्हाधिकारी पासून ते तालुका पातळीवरील अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर काम करतात. यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना सुध्दा शिवसैनिकांची कामे होत नाहीत. असा आरोप आजी माजी पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही शिवसेनेच्या संपर्कप्रमुख किंवा संपर्कमंत्यांिलचा दबाव नसल्यामुळे अधिकारी शिवसैनिकांना बेरजेत धरत नसल्यामुळे शिवसैनिकांचा वाली कोण असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. –

शिवसेनेच्या पक्ष वाढीच्या कामाला स्थानिक प्रशासकीय अधिकारी आडवे येत असून जाणिवपूर्वक शिवसेना पदाधिकाऱ्यांची कामे बाजूला ठेवली जातात. बहुतांश अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेते मंडळीच्या इशाऱ्यावर काम करतात. या सर्वांना जरब बसण्यासाठी व शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी शिवसेनेचे माजी आ.नारायण पाटील यांना शिवसेने मानाचे पद देवून त्यांच्यावर संघटना मजबुतीची जबाबदारी द्यावी.

गहिनीनाथ ननवरे, शिवसेना सभापती, पंचायत समिती करमाळा –

माजी आ.नारायण आबा पाटील यांना ताकद देण्यासाठी शिवसेनेने राज्यमंत्री दर्जा असलेल्या महामंडळाचे अध्यक्षपद द्यावे. 2019 च्या निवडणूकीत नारायण पाटील यांच्यावर शिवसेनेतील राजकीय गटबाजीमुळे अन्याय झाला. नारायण पाटील यांचे वैयक्तीक हेवे दावेतून तिकीट कापण्यात आले. तिकीट कोणी कापले त्यामुळे किती नुकसान झाले हे पाहता पुन्हा एकदा नारायण पाटीलांना महामंडळ देवून त्यांचे पुर्नवसन करावे.

-अनिरुध्द कांबळे, शिवसेना अध्यक्ष, सोलापूर जिल्हा परिषद.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE