निसर्गप्रेमी प्रतिष्ठान च्या वतीने पर्यावरणपूरक घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन
करमाळा समाचार
यंदाच्या गणेशोत्सवावर जरी कोरोना चे संकट असले तरीही महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी निसर्गप्रेमी प्रतिष्ठान च्या वतीने करमाळा शहरासाठी पर्यावरणपूरक घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
गणपती हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. गणेशोत्सव म्हणजे प्रत्येकाला लागलेली आतुरता आणि श्रद्धेने व भक्ती भावाने हा सण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोरोना महामारीच्या काळातसुद्धा आपल्या बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता आणि जोश कायम आहे.

आपली संस्कृती आणि पंरपरा कायम ठेवत आपल्या कला जोपासणार्या भक्तांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिष्ठान चे सचिव नरेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

या स्पर्धेतील विजेत्यांना प्रोत्साहन पर पारितोषिक देण्यात येणार आहे तसेच सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकांना प्रमनपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी डॉ.अमोल घाडगे आणि डॉ.बालाजी कटके यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.तरी जास्तीत जास्त कुटुंबांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजपा व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी केले आहे.