करमाळ्यातुन पुण्याकडे जाताना महिलेच्या बारा तोळ्यांवर चोरांचा डल्ला
प्रतिनिधी | करमाळा
शहरातील आपल्या माहेराहुन घरी परत जाताना एका महिलेच्या बॅग मधील बारा तोळे सोने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदरची चोरी करमाळा औद्योगिक वसाहत ते वीट या अंतरादरम्यान बसने जात असताना लक्षात आली. सदरचा प्रकार गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनोळखी चोरा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शोभा सुनिल सस्ते (वय ४५) रा.शांती निकेतन सोसायटी, कात्रज ते कोढवा रोड, पुणे असे त्या महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, सस्ते या आपल्या वैयक्तिक कामासाठी पुण्याहून करमाळ्यात आल्या होत्या. गुरुवारी त्या पुण्यासाठी माघारी निघाल्या त्यावेळी त्यांनी एका बॅगेत सोन्याचे दोन चार तोळ्याचे गंठण, दोन तोळ्याचे नेकलेस, दोन तोळ्याचे सोन्याचे बांगड्या, सोन्याची चैन व पॅडल एक तोळा, एक तोळ्याचे पोत, एक तोळ्याचे कानातील वेल, एक तोळ्याचे मीनी गंठण असा एकुण बारा तोळ्यांचा मुद्देमाल घेऊन निघाल्या होत्या.

करमाळा येथील बस स्थानकावर फलाट क्रमांक एक वर बसुन त्या गाडीत जाऊन बसल्या सकाळी नऊ ला घरातुन निघाल्यानंतर सकाळी दहा पर्यत गाडी पुणे रस्त्याने वीट पर्यत पोहचल्यावर त्यांनी बॅग तपासली त्यावेळी सोन्याच्या वस्तु नसल्याचे आढळुन आले. त्यानंतर त्यांनी करमाळा पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवले पण अद्याप काहीच हाती लागले नाही.
सदर भागातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेणे सुरु आहे. तर पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक एम एन जगदाळे हे करीत आहेत.