….. अन्यथा सर्व पक्षीय नेते व शेतकरी बांधव यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन
करमाळा समाचार
पूर्व भागातील सिना कोळगाव धरणग्रस्त शेतकरी बांधव यांचा वीज पुरवठा आठ तास चालू करावा, अन्यथा सर्व पक्षीय नेते, व शेतकरी बांधव यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करून साडे येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकले जाणार असल्याचे लेखी निवेदन राज्याचे ऊर्जा मंत्री यांना दिले आहे. अशी माहिती सीना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष सतीश नीळ पाटील यांनी दिली आहे.

श्री सतीश नीळ पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, पूर्व भागातील शेतकरी बांधव गेल्या तीन वर्षांपासून पाण्या विना तडफडत होता, सतत दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करत कसेबसे जीवन जगत होता, सिना कोळगाव धरण पूर्ण कोरडे फट फडले होते म्हणून आम्ही सर्वच शेतकरी बांधव आमच्या नशिबाला दोष देवून, पोटाला चिमटा घेऊन गप्प गुमान बसलो होतो पण गेल्या वर्षी पाऊस पाणी झाल्यामुळें धरण पूर्ण भरलेले आहे. त्यामुळे मोठ्या आशेने आम्ही सर्वच शेतकरी बांधव यांनी उसनवारी पैसे घेऊन ऊस पीक, केळी, व इतर अन्य पिके घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आत्ता वीज वितरण कंपनीच्या वतीने आमच्या पूर्व भागातील वीज पुरवठा फक्त चारच तास चालू ठेवलेला आहे, तो पण पूर्ण दाबाने होत नाही, याशिवाय वीज पुरवठा बंद केले वर आमच्या पूर्व भागातील शेतकरी बांधव यांनी जमेल तसे वीज वितरण कंपनीचे बिल भरलेले आहेत.

सिना कोळगाव धरणावर अवलंबित असलेल्या निमगाव (हवेली) आवाटी, कोळगाव, हिवरे, गौंडरे, नेरले,हिसरे, मिरगव्हाण आदी गावांतील शेतकरी वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे अत्यंत दबून जाणार आहे, आर्थिक दृष्ट्या नागविला जाणार आहे, उभी पिके जळून खाक होणार आहेत, तसेच पूर्व भागातील शेतकरी हे आपल्याच राज्यातील, व करमाळा तालुक्यातील आहेत, याचा वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांना विसर पडला आहे की काय असं वाटतं आहे तालुक्यातील इतर भागात पूर्ण दाबाने व आठ तास वीज पुरवठा चालू असतो तर आमच्याच पूर्व भागात चारच तास का? आणि जर आमचा पूर्व भाग इतर राज्यात, तालुक्यात येत असेल तर तसे तरी आम्हास सांगा असेही श्री नीळ पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांना प्रश्न विचारला आहे
पूर्व भागातील शेतकरी बांधव यांच्या वर नेहमीच अन्याय होत आहे, पूर्व भागातील वीज, पाणी रस्ते अश्या विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी कोणीही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत, जे आमच्या पूर्व भागातून जि.प. व पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडून दिलेले आहेत ते तर कधीच या प्रश्नावर बोलत नाहीत. त्यामुळे या पुढे आम्ही सर्वच पूर्व भागातील शेतकरी बांधव कोणावर ही अवलंबून न राहता कोणत्याही प्रकारचे शासकीय गुन्हे दाखल झाले तरी न घाबरता न डगमगता तोंड देत, आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर येऊन वीज पुरवठा आठ तास चालू झाल्याशिवाय मागे हटणार नाही. असेही श्री सतीश नीळ पाटील यांनी निक्षून सांगितले.
पूर्व भागातील विविध प्रश्नावर शाहू दादा फरतडे, संतोष सोणवर, आबासाहेब अंबारे व काही मोजकेच लोक आवाज उठवीत असतात, या पुढे पूर्व भागातील शेतकरी बांधव व सर्व तरुण पिढीला बरोबर घेऊन येत्या तीन चार दिवसांत आमचा वीज पुरवठा आठ तास चालू न झाल्यास गौंडरे फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करून, वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांना घेराव घालून, साडे येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकले जाणार आहेत असेही श्री सतीश नीळ पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच या निवेदनाच्या प्रती सर्व सबंधित अधिकारी यांना दिलेल्या आहेत.