पाटलांनी पावर दाखवली , शिवसेनेला आत्मचिंतनाची गरज ; शिंदेंनी कोळश्यासाठी हिरा गमावला !
करमाळा समाचार
शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर कोणत्याही अटीशिवाय माजी आमदार नारायण पाटील यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. पण पक्षातुन होत असलेल्या दुर्लक्षामुळे किंवा कोणतेही स्पष्ट भुमिका घेतली जात नसल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून शिंदे गटासह महायुतीला मोठा धक्का दिला. त्यांच्या या प्रवेशामुळे करमाळा तालुक्यातून शरद पवार गटाला मताधिक्य मिळताना दिसत आहे.

करमाळा तालुक्यामध्ये शिंदे सेनेत नेहमीच कुरघोड्यांची राजकारण राहिलेली दिसून आले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये आपापसात अपेक्षित असे मनोमिलन होताना आजपर्यंत दिसून आले नाही. यामुळे पक्ष वाढीमध्ये तोटे होताना दिसून येत आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नसलेले संगनमत व वरिष्ठ पातळीवरून झालेले दुर्लक्ष यामुळे माजी आमदार नारायण पाटील यांनाही पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करावा वाटावा हा शिंदे गटासाठी चिंतनाचा विषय आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार) व शिवसेना (एकनाथ शिंदे) एकत्र आल्यामुळे तालुक्याचे राजकारणही बदलणार होते, अशा परिस्थितीत स्थानिक काही मोजके पदाधिकारी माजी आमदार नारायण पाटील यांच्या विरोधात भूमिका घेत असतानाही वरिष्ठ पातळीवरून कसलेही लक्ष देण्यात आले नाही यामुळे पक्षाला पाटील यांची गरज नाही असे दिसून येत होते. यामागे शिंदे गटाकडे करमाळा तालुक्यात तुल्यबळ नेते असावेत किंवा येणाऱ्या काळात युती धर्म पाळत आपल्याकडे असलेल्या तुल्यबळ उमेदवाराला डावलून विद्यमान आमदारांना पाठिंबा देणे हा हेतू असू शकतो. त्यामुळे पाटील यांनी पक्ष सोडेपर्यंत शिंदे गटाकडून हालचाली होताना दिसून आल्या नाहीत.
लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार गटाकडून बेरजेचे राजकारण होत असताना महायुतीला अतिआत्मविश्वास नडला. इतर पक्षाकडून ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे जुळवाजुळ सुरू होती तिथेच शिंदे गटाने मात्र मातब्बर नेत्याला पक्षात थांबवण्यासाठी कसलेही प्रयत्न केले नाहीत. याचा फटका निवडणुकीत दिसून आला. या सर्व प्रकाराला स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून गेलेल्या सूचनाही जबाबदार असू शकतात. पण पाटील यांनी पक्ष सोडल्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये करमाळा तालुक्यात शिवसेना (शिंदे गटाची) आता पीछेहाट झालेली दिसून येऊ शकते. ज्या ठिकाणी विधानसभेसाठी तगडे आव्हान उभे करणारे व स्वबळावर पदाधिकारी व स्थानिक निवडणूक जिंकणारे पाटील गटातून गेल्यामुळे आता एका एका जागेसाठी शिंदे गटाला दुसऱ्या पक्षावर अवलंबून राहावे लागू शकते. त्यामुळे “कोळशासाठी शिंदे गटाने हिरा गमावला” असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.