कुकडीचे आवर्तन सोडण्याचा मार्ग मोकळा ; आ. पवार – आ. शिंदेंची माहीती
करमाळा समाचार
कुकडी कालवा मंडळांतर्गत लाभक्षेत्रात येणाऱ्या पारनेर, श्रीगोंदा ,कर्जत आणि करमाळा या तालुक्यांसाठी 3. 50 टीएमसी पाण्याचे 28 दिवसाचे आवर्तन दिनांक 9 मे 2021 पासून सुरू होणार होते. त्याचा प्रोग्राम जाहीर झालेला होता, परंतु सदर आवर्तन तात्पुरते स्थगित केले होते.

जुन्नर तालुक्यातील प्रशांत आवटी यांनी याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज न्यायालयात सुनावणी दरम्यान त्यांनी याचिका मागे घेतली त्यामुळे प्रकल्पाचे नियोजित आवर्तन उद्यापासून सुरू होणार असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
कुकडी कालवा सल्लागार समितीच्या 9 एप्रिल 2021 च्या बैठकीमध्ये उन्हाळी आवर्तन याबाबत चर्चा होऊन निर्णय घेण्यात आलेला होता. या बैठकीतील निर्णयाविरुद्ध श्री प्रशांत आवटी यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. मा. उच्च न्यायालयाने दिनांक 9 मे 2021 पासून सुरू करण्यात येणाऱ्या उन्हाळी आवर्तनाला तात्पुरती स्थगिती दिली होती.

याचिकाकर्त्यांनी आपली याचिका माघारी घेतल्यामुळे सदर आवर्तन सुरू करण्यास कोणतीही अडचण येणार नाही . त्यामुळे 9मे पासून स्थगित केलेले कुकडी प्रकल्पाचे आवर्तन उद्यापासून प्रोग्राम प्रमाणे सुरू होणार असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे व आ. रोहित पवार यांनी दिली.