फड सांभाळ तुऱ्याला ग आला , तुझ्या ऊसाला लागल कोल्हा ; अतिरिक्त उसामुळे शेतकरी हवालदिल
फड सांभाळ तुऱ्याला ग आला…..
करमाळा समाचार -संजय साखरे
फड सांभाळ तुऱ्याला ग आला ,तुझ्या ऊसाला लागल कोल्हा,,,,,,, या अस्सल मराठमोळ्या लावणीची प्रचिती करमाळा तालुक्यातील उसाच्या फडावर नजर टाकली की आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही . गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. हमखास उत्पन्न मिळवून देणारे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली आहे. मात्र आता ऊस वेळेवर कारखान्याला जात नसल्याने शेतकऱ्यांच्या नाकी दम आला आहे .

तालुक्यातील व शेजारील कारखान्यांनी जास्त साखर उतारा देणाऱ्या उसाची तोड केल्यामुळे 265 जातीचा ऊस शेतात मोठ्या प्रमाणावर उभा आहे .आणि या जातीच्या उसाला तुरा येण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळे उस आतून पोकळ होऊन वजन घटण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जाऊ लागली आहे. त्यामुळे एवढ्या वर्षी तरी आमचा हा ऊस न्या, पुढल्या वर्षी आम्ही चांगल्या जातीच्या उसाची लागवड करू अशी चर्चा आता शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.
या क्षेत्रातील तज्ञांच्या मते शेतामध्ये दीड ते दोन महिन्याच्या पुढे तुरा आलेला ऊस राहिला तर त्याला मोठ्या प्रमाणावर आनसा फुटतात. व ऊस पोकळ पडण्यास सुरुवात होते. त्यातील साखरेचे विघटन होते .त्यामुळे तुला आलेल्या उसाची लवकर तोडणी करावी. सततच्या पावसामुळे उसाला नत्राचे हप्ते वेळेवर देता न आल्याने उसाला तुरा येतो. यामुळे उसाला नत्राची मात्रा व्यवस्थित दिली आणि जुलै-ऑगस्ट मध्ये शेतात पाणी साचून नाही दिले की तुरा येण्याचे प्रमाण कमी होते.

माझ्या उसाची लागवड ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये केलेलीआहे. म्हणजे आता जवळजवळ ऊसाला सोळा महिने पूर्ण झाले आहेत .आता ऊस पूर्णपणे परिपक्व झाला आहे. ऊसाला मोठ्या प्रमाणावर तुरेआल्याने वजन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे कारखान्याने उसाची तोडणी लवकर करून सहकार्य करावे- आप्पासाहेब कचरे -ऊस उत्पादक शेतकरी, राजुरी, ता करमाळा