पोलिसांचा छापा ; ४ लाख २३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
करमाळा :

गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवणाऱ्या व्यक्तींवर करमाळा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ४ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार आणि विविध ब्रँडची गोवा बनावटीची दारू असा एकूण ४ लाख २३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ९ रोजी रात्री सुमारे १० वाजता करमाळा तालुक्यातील देवळाली येथील अमोल शिंदे यांच्या राहत्या घरासमोर व शेतात ही कारवाई करण्यात आली. गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररीत्या विनापरवाना विक्री करण्यासाठी साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी केलेल्या तपासणीत स्विफ्ट डिझायर कारमधून एका कागदी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये Royal Impact Grain व्हिस्की च्या १२ बाटल्या आढळून आल्या. त्यानंतर आरोपीच्या शेतातील दारूच्या साठ्याची तपासणी करण्यात आली. तेथे विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये व बॉक्समध्ये भरून ठेवलेल्या आढळल्या.

या प्रकरणी अमोल सदाशिव शिंदे व त्याचा मित्र विकी अंधारे यांच्याविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा. पोलीस निरीक्षक बालाजी वकसे पुढील तपास करीत आहेत. सदर कारवाई पोलीस निरीक्षक रणजीत माने, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी वळसने, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.


