बदलते राजकारण आणि आजची तरुणाई या विषयावर प्रा.भालचंद्र बिचितकर यांचे व्याख्यान संपन्न
करमाळा समाचार
केम- श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज, केम याठिकाणी बदलते राजकारण आणि आजची तरुणाई या विषयावर राज्यशास्त्र विषयाचे अभ्यासक व आर्ट्स ॲण्ड कॉमर्स कॉलेज, नागठाणे जि.सातारा येथील प्रा.भालचंद्र बिचितकर यांचे अतिशय मौलिक असे व्याख्यान संपन्न झाले.

प्रा.भालचंद्र बिचितकर यांनी ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना देशातील स्वातंत्रपूर्व , स्वातंत्र्योत्तर व आजच्या चालू काळातील बदलत्या राजकारणाचा आढावा घेतला. आजची तरुणाई ही राजकीय पक्षांची प्रमुख बलस्थान आहे. राजकीय नेत्यांच्या कोणत्याही आमिषाला किंवा अविवेकी विचाराला बळी न पडता आपल्या सद्सदविवेकबुद्धीने सारासार विचार करून आपली भूमिका घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील आजच्या राजकीय-सामाजिक- आर्थिक परिस्थितीवर त्यांनी सखोल विवेचन केले.

हा कार्यक्रम प्राचार्य श्री सुभाष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या वेळी आभारप्रदर्शन कु. विद्या कांबळे या विद्यार्थिनीने केले. या कार्यक्रमास प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे प्रा. संतोष साळुंखे, प्रा.संतोष रणदिवे, प्रा . सतीश बनसोडे यांनी सहकार्य केले.