कर्मकांडापासून दूर राहिल्यास समाजाची प्रगती – प्रा. डॉ .श्रीमंत कोकाटे
करमाळा समाचार – संजय साखरे
आजचा शिक्षित समाजही सत्यनारायण, नारायण नागबळी, शांती यासारख्या कर्मकांडात अडकून राहिला आहे. या कर्मकांडातून दूर राहिला तरच सर्व बहुजन समाजाची प्रगती होणार आहे. असे प्रतिपादन ख्यातनाम इतिहास संशोधक व महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणीचे वक्ते प्राध्यापक डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी केले.
काल राजुरी तालुका करमाळा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी कोकाटे बोलत होते.

देव धर्माच्या नावावर सामान्य लोकांच्या अंधश्रद्धाळूपणाचा फायदा घेऊन काही लोकांनी तुमच्या प्रगतीची दारे बंद करून टाकली आहेत. यामधून बाहेर पडायचे असेल तर अंधश्रद्धेला फाटा दिला पाहिजे. आपण समजतो तितके गंगेचे पाणी पवित्र नसून शास्त्रज्ञांनी ते लोकांना न पिण्याचा सल्ला दिला आहे. आपल्याकडे काशीला मरण येणे भाग्याचे समजले जात असले तरी तेथील प्रेताची विल्हेवाट लावण्याची भयानक परिस्थिती पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जेऊर येथील भारत महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संजय चौधरी यांचे व पारेवाडी येथील बाल व्याख्याते प्रतीक नवले याचे भाषण झाले.
याप्रसंगी करमाळा तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे, नगरसेवक प्रवीण जाधव, सेवानिवृत्त कृषी अधिकारी निळकंठ अभंग, सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे, सोगावचे सरपंच स्वप्निल गोडगे, नवनाथ मोरे, उंदरगावचे उपसरपंच रेवणनाथ निकत, सावडीचे सरपंच भाऊसाहेब शेळके, प्राध्यापक रवींद्र शिंदे, प्राध्यापक रवींद्र दवणे,युनिसभाई शेख यांच्यासह परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी केले तर सूत्रसंचालन धनंजय साखरे यांनी केले. आभार गणेश जाधव यांनी मानले.