दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन आजपासून सुरू
करमाळा समाचार
करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणाऱ्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन आजपासून आ. संजय मामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाले. ऑक्टोबर मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कुंभेज याठिकाणी कॅनॉलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सदर कॅनॉलची तात्काळ दुरुस्ती करून घेऊन तसेच योजनेचे थकीत वीज बिल 51 लाख 32 हजार कृष्णा खोरे महामंडळाला भरण्यास आ. संजयमामा शिंदे यांनी भाग पाडले. त्यामुळे रब्बी आवर्तन वेळेवर सुरू होऊ शकले.

आज दहीगाव येथील फक्त दोन पंप सुरू करण्यात आले आहेत. कुंभेज येथील कॅनाल दुरुस्तीच्या ठिकाणी पाण्याची गळती पाहून त्यानुसार उर्वरित पंप चालू करून योजना 100 टक्के क्षमतेने चालवली जाईल. मुख्य कॅनॉलच्या शेवटच्या टप्प्यात निंभोरे, घोटी या भागात गेट बसविण्याची कामे सुरू असल्यामुळे या आवर्तनाचे पाणी सुरुवातीला वरच्या भागात दिले जाईल त्यानंतर टेलची कामे पूर्ण झाल्यावर त्या भागात पाणी सोडले जाईल असे कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक बारा चे उपअभियंता सी.ए .पाटील यांनी सांगितले.
