तालुक्यातील कोर्टी व वीट येथील कुंटणखान्यावर छापा ; चालकासह ग्राहक ताब्यात
करमाळा समाचार
मागील काही दिवसांपासून कोर्टी परिसरात कुंटणखाना सुरू असल्याबाबत तक्रारींचा पाऊस पडत होता. याबाबत समाज माध्यमातून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. यासंदर्भात आता सोलापूर पोलीस तसेच करमाळा पोलीस यांच्या वतीने संयुक्त कारवाई करीत कोर्टी तसेच वीट येथील कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी 15 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कारवाई रात्री बाराच्या सुमारास करण्यात आली. यावेळी सोलापूर येथील एक पथक व करमाळ्यातील पथक असे मिळून ही कारवाई करण्यात आली. रात्री उशिरा सुरू करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये वीट येथील एका हॉटेलच्या मध्ये असलेल्या शेतीमध्ये सदरचा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याशिवाय कोर्टी येथील लकी लॉज येथे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी चालकांना ताब्यात घेत सदरची कारवाई करण्यात आली आहे.

या छाप्यामध्ये वीट परिसरात पाच तर कोर्टी परिसरात सहा महिला मिळून आल्या आहेत. याशिवाय चालक व ग्राहक ही असल्याची माहिती मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदरची कारवाई प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. यामध्ये करमाळा पोलीस व सोलापूर पोलीस यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.