बँक ऑफ इंडियाच्या “थकीत कर्जमुक्त गाव” योजनेत राजुरी अव्वल
करमाळा समाचार -संजय साखरे
बँक ऑफ इंडियाने सोलापूर विभागाचे झोनल मॅनेजर श्री लग्नजीत दास यांच्या मार्गदर्शनाखाली थकीत कर्जमुक्त गाव ही योजना आणली होती. बँक ऑफ इंडियाच्या कोर्टी ता .करमाळा शाखेच्या कार्यक्षेत्रातील गावांपैकी एक असणाऱ्या राजुरी गावात बँक ऑफ इंडिया ने नऊ कोटी सहा लाख 63 हजार रुपयांचे कर्ज वाटप केले होते. त्यापैकी फक्त 70 लाख रुपये कर्ज थकीत होते. बँक ऑफ इंडियाच्या कोर्टी शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद देऊन राजुरी तील कर्जदार शेतकऱ्यांनी थकीत असणारे 70 लाख रुपये कर्ज भरले आहे. बँकेच्या या नियमानुसार राजुरी हे एकमेव गाव थकीत कर्जमुक्त(एन. पी.ए ) झाले आहे.

या कामी बँकेच्या सोलापूर विभागाचे झोनल मॅनेजर श्री लग्नजीत दास यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली विभागाचे वरिष्ठ प्रबंधक श्री महेंद्र मोराळे, बँक ऑफ इंडिया कोटी शाखेचे मॅनेजर श्री राहुल तळेकर व बँक मित्र गणेश दिगंबर जाधव यांच्या प्रयत्नाने हे गाव एनपीए मुक्त झाले आहे.
राजुरी हे गाव एन. पी .ए मुक्त झाल्यामुळे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत लवकरच राजुरी गावात सर्व कर्जदार शेतकऱ्यांच्या अभिनंदनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
भविष्यकाळात राजुरीतील बचत गट, किसान कर्ज योजना, पीक कर्ज योजना या सर्व योजनेखाली शेतकऱ्यांनी कागदपत्राची पूर्तता केल्यास त्यांना तात्काळ कर्ज पुरवठा केला जाईल.
राहुल तळेकर,शाखा व्यवस्थापक,बँक ऑफ इंडिया ,कोर्टी
