करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्याच्या रोहित दंगाणेची दिल्लीतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड!

करमाळा समाचार

राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई; ७९ किलो वजन गटात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक
करमाळा समाचार | जिंती

करमाळा तालुक्यातील जिंती गावचा सुपुत्र पैलवान रोहित दिलीप दंगाणे याने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. १९ वर्षांखालील ७९ किलो वजन गटात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवत त्याने दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. रोहितच्या या यशामुळे जिंतीसह संपूर्ण करमाळा तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या वतीने नेवासा फाटा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे २१ व २२ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील आठ विभागांतील प्रत्येकी एका वजन गटातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत रोहितने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आणि राष्ट्रीय स्पर्धेच्या दिशेने दमदार पाऊल टाकले.

रोहित हा वालचंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कळंब येथील विद्यार्थी असून सध्या इंदापूर येथील मारकड कुस्ती केंद्रात कुस्तीचा सराव करत आहे. त्याला एन.आय.एस. कुस्ती प्रशिक्षक मारुती मारकड सर, जागतिक कुस्ती प्रशिक्षक सागर (दादा) मारकड, एन.आय.एस. कुस्ती प्रशिक्षक मंजित सिंग (हरियाणा), वस्ताद गोविंद निकम तसेच क्रीडाशिक्षक अमित काळे सर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

रोहितने तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागीय आणि राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची कमाई करत आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे. मैदानी कुस्ती स्पर्धांमधूनही त्याने ग्रामीण भागातील कुस्तीप्रेमींची मने जिंकली आहेत.

आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी रोहितला मिळणार असल्याने त्याच्या पुढील कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच्या या यशाबद्दल गावकरी, क्रीडाप्रेमी आणि विविध स्तरांतून अभिनंदन केले जात असून राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE