लोकसभा निवडणूकीत समाजमाध्यमात अफवांचा बाजार ; अफवेला अफवेने उत्तर !
करमाळा समाचार – विशाल घोलप
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये धैर्यशील मोहिते पाटील व खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची कार्यकर्ते सोशल मिडियात आपापसात भिडत आहेत. तर नेत्यांच्या बैठका व दौरेही सुरू झाले आहे. त्यात आता सोशल मीडियामध्ये अफवांचा बाजारही सुरू झाल्याचा दिसून येऊ लागला आहे. त्यातील एका अफवेला दुसऱ्या अफवेने उत्तरही मिळू लागल्याने नेमकी खरे काय आणि खोटे काय हे नेत्यांनी स्पष्ट केल्याशिवाय कळणार नाही.

दोन दिवसांमध्ये दोन्ही गटांकडून वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील समर्थक व समविचारी नेत्यांना घेऊन अकलूज येथे बैठक पार पडली. तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक नेते व कार्यकर्त्यांची बैठक आमदार संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊस वर पार पडली. त्या दोन्ही बैठकांनंतर दोन्हीही बाजूने आपापल्या मतावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसून आले.

त्यानंतर आज धैर्यशील मोहिते पाटील हे करमाळा दौऱ्यावर होते. तर दोन्हीही उपमुख्यमंत्री व इतर नेत्यांसह श्रीमंत रामराजे निंबाळकर यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. यावेळी निंबाळकर यांनी युती धर्म पाळावा अशी सूचना करण्यात आली. तर रामराजे यांनीही आपले म्हणणे मांडले आहे. यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट भूमिका न घेता “स्थानिक कार्यकर्त्यांना व माढा लोकसभा मतदारसंघातील समविचारी नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेईल” असे सांगितले. यातून त्यांची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नव्हती. पण सोशल मीडियामध्ये वेगवेगळे मेसेजेस फॉरवर्ड होऊ लागले आणि अफवांचा बाजार सुरू झाला.
रामराजेंच्या बैठकीनंतर माढ्याचा तिढा सुटला म्हणून एक मेसेज फॉरवर्ड होऊ लागला. तर आता 1000% विजय होणार अशी शाश्वती ही देऊ लागले.
याच अफवेला उत्तर म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बनावट अकाउंट वरून खोटा मेसेज व्हायरल करून अफवेनेच उत्तर देण्याचे काम मोहिते समर्थकांनीही केलेले दिसून येत आहे. सदरच्या मेसेज मध्ये मला कोणत्याही राजाचा पाठिंबा नकोय आणि मी मतांसाठी कोणाच्या बंगल्यावर ही जाणार नाही. माझ्यासोबत माझे जिवलग पाच आमदार आहेत असा मेसेज फॉरवर्ड होऊ लागला. परंतु आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सदरची दोन्हीही मेसेज खोटे आहेत.
असा फेक मेसेज फिरवला जात आहे. विशेष म्हणजे पहिल्या मेसेजला दुसरा मेसेज टाकल्यानंतर पहिल्या व्यक्तीने अफवा पसरवली त्याने दुसऱ्याला म्हणाला अफवा पसरू नका त्यानंतर दुसरा म्हणाला तुम्ही काय करताय ? आणि हा विषय इथेच संपला. अजुनतर बरेच दिवस बाकी आहेत अजुन काय काय घडामोडी घडतील याकडे पण लक्ष राहिल.