उजनी जलाशयात बुडुन सख्या भावाचा मृत्यु: धार्मिक कार्यासाठी आले होते गावी
करमाळा: तालुका प्रतिनिधी
उजनी जलाशयाच्या पाण्यात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुमित दत्ता ढावरे (वय 18) व रोहित दत्तू ढावरे (वय 16) रा. मुळगाव वांगी नंबर 1 तालुका करमाळा हल्ली पुणे असे पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या दोघा सख्या भावांची नावे आहेत. हा प्रकार मंगळवारी (ता.17) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वांगी नंबर 1 येथील स्मशानभूमी जवळील उजनीच्या पाण्यात घडला आहे. मात्र हा प्रकार आज (ता. 18 ) बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की वांगी नंबर 1 येथील दत्तू गुलाब ढावरे यांचा परिवार पुणे येथे उदरनिर्वाहासाठी राहतात. एक महिन्या पूर्वी त्यांनी गावाकडे येऊन राहायचे म्हणून वांगी येथे शेड बांधले होते. त्यानंतर ते पुन्हा हे कुटुंब पुणे येथे मोलमजुरीसाठी गेले होते. वांगी येथे धार्मिक कार्यक्रम म्हणून जळी म्हणजे बोकडाचे जेवणाचे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन (ता.17 )मंगळवार रोजी रात्री वांगी येथे ठेवले होते.

दरम्यान सुमित ढावरे व रोहित ढावरे हे दोघे बंधू आंघोळीसाठी म्हणून स्मशान भूमी च्या बाजूने उजनी जलाशयाच्या पात्रात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गेले होते. यावेळी बहुतेक त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने व त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यु झाला. या घटनेची कल्पना परिसरातील कोणालाही नव्हती.
दरम्यान मंगळवारी संध्याकाळी रात्रीपर्यंत जेवणाच्या कार्यक्रमाला दोघे बंधू हजर नसल्याने त्याची शोधाशोध करण्यात आली होती. त्यामुळे ते आढळून न आल्याने त्यांचे वडील दत्तू गुलाब ढावरे (वय 55) यांनी (ता 18) रोजी करमाळा पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्रार दिली होती. दरम्यान आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्या परिसरातील मच्छिमारांना रोहित ढावरे यांचे प्रेत तरंगत असल्याचे आढळून आले. याची माहिती त्यांनी परिसरातील लोकांना दिली. यावेळी थोडी शोधाशोध केली असता सुमित ढावरे यांचेही प्रेत वर तरंगत आले. याची खबर करमाळा पोलिसांत देण्यात आली.
दरम्यान करमाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, लोंढे, गवळी आदींनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही प्रेत ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदनासाठी करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आणले. रात्री उशिरा वांगी नंबर एक या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान करमाळा पोलिसात याची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.