युरियाची नफेखोरी व कृत्रिम टंचाई थांबवण्यासाठी शंभुराजेंनी सुचवला पर्याय
प्रतिनिधी – सुनिल भोसले
युरिया खत विक्रीतील कृत्रिम टंचाई व अनियमितता रोखण्यासाठी खताची विक्री वि. का. से. सह. सोसायटी मार्फत करावी अशी मागणी जगताप गटाचे युवानेते शंभूराजे जगताप यांनी तहसीलदार समीर माने साहेब व कृषिअधिकारी सुरज पाटील साहेब,करमाळा यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


याविषयी अधिक माहिती देताना जगताप यानी सांगितले की, महाराष्ट्रात व सर्वत्र यंदा खरिप हंगामास पोषक वातावरण असुन ,खरिपाच्या पेरणी नंतर समाधानकारक पाऊस झाला आहे. खरीप लागवडित जिल्ह्यासह करमाळा तालूक्यात विक्रमी पेरणी झाली आहे. पिकांच्या पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या युरिया खताची मागणी सर्वत्र मोठ्या स्वरूपात असल्याने काही दुकानदार या खताची कृत्रिम टंचाई करत असल्याचे निदर्शनास येते. तसेच युरिया सोबत इतर स्वरूपाची अनावश्यक खते घेण्यास शेतकऱ्यांना भाग पाडत आहेत.
करमाळा तालूक्यातील 60% क्षेत्र हे जिरायती स्वरूपाचे असून हंगामी खरीपाची लागवड करणाऱ्या शेतकर्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे युरिया शिवाय इतर खते या शेतकऱ्यांना अनावश्यक आहेत. तसेच काही दुकानदार शेतकऱ्यांना तुम्ही आमचे नेहमीचे ग्राहक नाहीत. मागील बाकी जमा केल्याशिवाय युरिया मिळणार नाही, तसेच युरिया खत जास्त भावाने विकने असे प्रकार घडत आहेत. सदरील प्रकार गरजेपोटी शेतकरी बांधव नजरेआड करित आहेत. तरी या खताचे वाटप गाव पातळीवरील विविध कार्यकारी सह. सोसायट्यांमार्फत वितरीत केले तर सर्व शेतकऱ्यांना सोसायटीकडे असणाऱ्या दफ्तरी रेकॉर्ड प्रमाणे क्षेत्रानुसार योग्यरितीने वितरित होईल तरी आपण योग्य ती दखल घेऊन युरियाची नफेखोरी व कृत्रिम टंचाई थांबवावी अशी मागणी जगताप यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे.