करमाळ्यात राजकीय उलथापालथीचे संकेत ; दोन मोठ्या गटात दिलजमाई होण्याची शक्यता
करमाळा समाचार
बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी माजी आमदार शामल बागल यांचे चिरंजीव व शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती स्वतः विजय बागल यांनी सोशल माध्यमांमध्ये सांगितले आहे. त्यावरून बागल व नारायण पाटील गट जवळ येतोय का ? जर तसे चिन्ह असतील तर हा करमाळ्यातील राजकारणात मोठी घडामोड ठरू शकते.

तालुक्याच्या राजकारणात मागील विधानसभेमध्ये विद्यमान आमदार संजय मामा शिंदे विजयी झाले होते. तर दुसर्या स्थानी नारायण आबा पाटील तर तिसऱ्या स्थानी रश्मी बागल या राहिल्या होत्या. त्यामुळे बागल गट बराचसा पीछाडीवर पडलेला दिसत होता. पण पुन्हा एकदा बागल गटाकडून सक्रिय होताना दिग्विजय बागल हे दिसत आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्याशी जवळीक साधण्याचा नेमकं दुसरं काय कारण असू शकतं यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर यापूर्वीच बाजार समितीच्या माध्यमातून माजी आमदार नारायण पाटील यांचे निकटवर्तीय सभापती शिवाजीराव बंडगर हे आधीच बागल यांच्यासोबत सत्ता सहभागी आहेत. तर आता अनिरुद्ध कांबळे यांच्यामार्फत बागल गट अजूनच पाटील यांच्या जवळ जातोय का याबाबत तालुक्यात राजकीय चर्चा सुरू आहे. असे झाल्यास तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ बघायला मिळू शकते.
भेटी संदर्भात बोलताना बागल म्हणाले , जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांची सहृदय भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. आजच्या बौद्धपौर्णिमेच्या शुभप्रसंगी सर्वात जास्त प्राणवायू देणारे ‘बोधिवृक्ष’ भेट दिले. बोधिवृक्षाचे(पिंपळ) महत्व अनन्यसाधारण आहे. सध्याची परिस्थिती पाहता सामाजिक बांधिलकी समजून आपणही आप-आपल्या परिसरात एक तरी पिंपळाचे झाड लावावे. याप्रसंगी केमचे माजी सरपंच अजित तळेकर, जिल्हा परिषद सदस्य निलकंठ देशमुख, देवा ढेरे, काका काकडे उपस्थित होते.