साधी कारवाई झाली तर बातम्या होतात ; मोठ्या उपस्याकडे दुर्लक्ष का ? पत्रकार व प्रशासनाला सवाल
करमाळा समाचार
एक ट्रॉली वाळू पकडली तर त्याची बातमी होते. पण आमच्या भागातून जवळपास 20 ते 30 टिप्पर भरून रोज वाळू वाहतूक होते. त्याच्याकडे प्रशासन व पत्रकार डोळे झाक करत आहेत. तुम्ही त्याच्या बातम्या का लावत नाहीत ? असा प्रश्न आता नागरिकांनी विचारला आहे. कुगाव परिसरातून सदरचा वाळू उपसा होत असून त्याकडे कमीत कमी पत्रकारांनी तरी लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

अवैधरित्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याबाबतचे वृत्त करमाळा समाचार न्युज पोर्टल व दैनिक दिव्य मराठी या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले होते. त्याच्यानंतर वाचकांकडून या संदर्भात फोनवरून माहिती सांगण्यात आली व उलट पत्रकारालाच जाब विचारला आहे. एखादी छाटछुट कारवाई केली जाते ती बातमी होते. पण राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे त्याच्यावर कारवाई कधी असा प्रश्नच आता ग्रामस्थ विचारू लागले आहेत.

यासंदर्भात कोणीच तक्रार का करत नाही असे विचारले असता वाळू माफियाच्या कोणी नादी लागायचे. त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे. तसेच जरी तक्रारी केल्या तरी प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे तक्रार करून तरी काय उपयोग अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ देऊ लागले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीच्या वाळू माफियांवर आवर कोण घालणार ? हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.