वृद्ध महिलेच्या अंगावर बसुन दाबला गळा ; मारहाण चोरी करुन चोरटे पळाले
करमाळा समाचार
तालुक्यातील केतुर क्रमांक दोन येथे अनोळखी दोन चोरट्यांनी वृद्ध महिलेला मारहाण करून तिच्याकडील गळ्यातील सोन्याचे मनी व काळातील कुंडके चोरून नेल्याची घटना २३ जून रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली आहे. नितीन शिवाजी देवकते (वय ३४) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे तर त्यांची आजी गोपाबाई देवकते (वय ७९) यांना मारहाण झाली आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, केतुर क्रमांक २ येथे देवकते कुटुंबीय घरात तर आजीबाई घरापुढे असलेल्या शेडमध्ये झोपल्या होत्या. मध्यरात्री नंतर पहाटे अडीच ते तीन च्या सुमारास दोन अनोळखी चोरटे हे आजी जवळ आले व त्यांनी एकाने अंगावर बसून गळा दाबला.

त्यावेळी दुसऱ्या व्यक्तीने गळ्यातील सोन्याचे मनी जबरदस्तीने ओढून घेतले. तर एका बाजूचे सोन्याचे कुडके ओढून काढले. त्यावेळी शेजारी पडलेल्या दगडी जात्याच्या तुकड्याने डोक्यात व तोंडावर मारहाण केली. या प्रकरणात आजीबाई गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या डोक्यातून रक्त येत होते. याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पस्तीस हजार रुपये मुद्देमाल चोरट्यांनी पळून नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गळ्यामध्ये ३० सोन्याचे मनी व एका बाजूच्या सोन्याची कुडके असे वस्तू चोरीस गेले आहेत. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर हे करत आहेत.