… म्हणुन अतिक्रमण काढण्याची नगरपरिषद धडपडतेय ; आम्ही त्यांचा डाव हाणुन पाडु – मनसे
करमाळा समाचार
फेरीवाले तसेच भाजी विक्रेत्यांना गाळ्यात किंवा गाड्यांवर भाजी विक्रीसाठी परवानगी असल्याने त्यांची दुकाने बंद करता येत नाहीत. त्यामुळेच त्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली दहशत निर्माण करून बंद करण्याचा डाव आखला जात आहे. तो डाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाणून पाडेल कोरोना आणि अतिक्रमण हे दोन वेगळे विषय असून फेरीवाले तसेच भाजी विक्रेत्यांना त्रास देऊ नये असे आवाहन तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी केले आहे.

करमाळा शहरात बस स्थानक तसेच पोथरे नाका, देवीचामाळ रोड या भागात हद्द वाढल्याने व्यवसाईक वाढले आहेत. त्या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून भाजी विक्रेते हे भाजी विकत आहेत. तर बस स्थानक व पोथरे नाका या ठिकाणी रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून भाजी विक्री केली जाते. तर देवीचामाळ रोड येथे गाड्यांमध्ये भाजी व फळ विक्री केली जाते. सध्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी भाजी विक्री ला मुभा दिल्याने अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. तर भाजी विक्री ही कशा पद्धतीने थोपवता येईल याकडे स्थानिक अधिकारी लक्ष देत असल्याचे दिसत आहे. आजपर्यंत यांना अतिक्रमण कधीच दिसले नाही. आज अचानक का दिसू लागले ? हा प्रश्न घोलप यांनी उपस्थित केला जात आहे.

यापूर्वी सुटसुटीत अंतरावर भाजी विक्री केली जात असतानाही पेट्रोल पंप, देवीचा माळ रोड परिसरात विक्रेत्यांना उठवले जात होते. त्यांच्या बसण्याने त्या परिसरात वाहतुकीला कसलाही अडथळा होत नव्हता. तरीही हा त्रास का दिला जात होता असा प्रश्न घोलप यांनी त्यावेळीही विचारला होता व भाजी विक्रेत्यांना आहे त्या ठिकाणी बसण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर पुन्हा एकदा नगरपालिका अतिक्रमणे यांच्या नावाखाली जागी झाली व अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या फक्त भाजीविक्रेत्यांसह इतर फेरीवाल्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. सध्या भाजीविक्रेते गाळे तसेच गाड्यांवर फिरत आहे. त्यांना रोखायचे कसे म्हणून अतिक्रमणाची ढाल समोर करून त्यांचे धंदे बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप भाजी विक्रेते करीत आहेत.
नुकतेच माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही या गोष्टीला विरोध केला आहे सध्या कोरोना काळात धंदे कोलमडून पडले आहेत व लोकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे मुख्याधिकारी विना पवार यांना अतिक्रमणाची मोहीम थांबवण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. तसेच व्यापाऱ्यांना वेळेची मुभा द्यावी अशी मागणीही जगताप यांनी तहसीलदार समीर माने यांच्याकडे केली आहे.
पोथरे नाका तसेच बस स्थानक व इतर ठिकाणी फेरीवाले रस्त्याच्या बाजूला उभे राहत असून त्यांचा वाहतुकीला कोणताही अडथळा होत नाही. त्यामुळे ज्या दिवशी नगरपरिषदेने ही मोहीम सुरू केली होती त्याच दिवशी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील सावंत यांनीही याला विरोध केला होता व फेरीवाल्यांची बाजू मांडली होती.