करमाळा पोलिसांचा वेगवान तपास ; चोवीस तासात चोराला अटक
करमाळा समाचार
नालबंद मंगल कार्यालय येथे उभे असलेल्या गाडीतून चोरीस गेलेली पर्स व त्यामधील मुद्देमाल आरोपीसह ताब्यात घेण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे. सदरची धडाकेबाज अशी कामगिरी करमाळ्यातील डीबी पथक तसेच पोलीस हवालदार भाऊसाहेब शेळके व मंगेश पवार यांच्या पथकाने केली आहे. सदरची कारवाई केवळ 24 तासात केल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

येथील नालबंद मंगल कार्यालय येथे लग्नासाठी आल्यानंतर एका महिलेची गाडीमध्ये ठेवलेली पर्स अज्ञात चोरट्यांकडून चोरून नेली होती. त्यामध्ये एक लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल होता, सदरचा प्रकार रविवारी दि २८ दुपारी दीडच्या दरम्यान घडला होता.

याप्रकरणी मोनिका वनवे वय ३९ रा. टिळेकर नगर कात्रज ता. हवेली जिल्हा पुणे यांनी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तात्काळ सूत्रे फिरवत डीबी पथक तसेच शहर बीट हवालदार यांना सदरचा तपास करण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी तांत्रिक बाबी तसेच गोपनीय माहितीच्या आधारावर एकाच ताब्यात घेण्यात यश आले आहे. तर त्याच्याकडून सदरचा मद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहेत.