भारतीय स्टेट बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ ; पुर्णवेळ अधिकारी नेमण्याची मागणी
जेऊर –
भारतीय स्टेट बँक जेऊर शाखेमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ होत असून गेली चार महिन्यापासून शेतकऱ्यांना शेती विषयक कर्ज पुरवठा करण्याकरिता संबंधित टेबलवर अधिकारी नसल्यामुळे जेऊर तसेच जेऊर परिसरातील अनेक दत्तक गावातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

याबाबत बँकेने त्वरित शेतकऱ्यांना पिक कर्ज तसेच शेती विषयक सर्व सुविधा बाबत जागरूकता दाखवा अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण केकान यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन करमाळा तहसीलचे नायब तहसीलदार विजय जाधव यांना देण्यात आले आहे.
यावेळी करमाळा तालुका भाजपा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे, सोलापूर जिल्हा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दीपक चव्हाण, मकाई कारखान्याचे माजी संचालक अमोल पवार, भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, नरेंद्रसिंह ठाकूर आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, कर्ज पुरवठा करण्याकरिता संबंधित विभागात अधिकारी नसल्यामुळे आम्ही तुम्हाला पिक कर्ज देऊ शकत नाही अशी उत्तरे गेली तीन ते चार महिन्यापासून शेतकऱ्यांना ऐकावयास मिळत आहेत. जेऊर परिसरातील अनेक गावे दत्तक असल्यामुळे दत्तक गावांना स्टेट बँकेमध्ये प्रकरणे दाखल करावी लागतात.
यामुळे इतर बँका शेतकऱ्यांना पिक कर्ज तसेच शेती विषयक कोणत्याही सुविधा मिळत नाही. सध्यातातडीने जेऊरशाखेत शेतकऱ्यांची पिक कर्जची गरज लक्षात घेता तातडीने पूर्णवेळ अधिकाऱ्याची नेमणूक करावी. अनेक शेतकऱ्यांना हप्ते भरण्याकरिता संबधित टेबलला अधिकारी नसल्यामुळे विनाकारण व्याज भरावे लागत आहे असे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. याबाबत जागरूकतेने लक्ष देऊन तरी संबंधित अधिकारी नियुक्ती करावी अशी मागणी केकान यांनी केली आहे.