आदिनाथवर मागच्या दाराचे उद्योग थांबवा व निवडणुकीला सामोरे जा
करमाळा समाचार
प्रशासक ही तात्पुरती व्यवस्था असते, प्रशासकला किंवा प्रशासकीय मंडळाला कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. त्यासाठी रजिस्ट्रारची मान्यता घ्यावी लागते. प्रशासकाने लवकरात लवकर निवडणूक घेऊन कारखाना नवीन संचालक मंडळाकडे सुपूर्त करायचा असतो. प्रशासकीय मंडळ आणून त्याअडून जर कोण आदिनाथ स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचे स्वप्न बघत असेल तर ते चुकीचे आहे असे मत ॲड. दीपक देशमुख यांनी व्यक्त केले आहे. याशिवाय समाजमाध्यमातुन या संभाव्य निर्णया विरोधात तीव्र पडसाद उमटत आहेत.


सध्याचा शासकीय प्रशासक बदलून नवीन प्रशासकीय मंडळ आणल्याने मोठा फरक पडणार नाही. प्रशासकीय मंडळ नेमण्याची कायदेशीर प्रक्रिया आहे, सहकार खात्याने प्रशासकीय मंडळात काम करण्यास कोणी सभासद इच्छुक आहेत का यासाठी नोटीस दिली पाहिजे. जास्तीत जास्त सभासदांना कळवले पाहिजे. तर चांगले, अनुभवी व तज्ञ सभासद त्यासाठी अर्ज करू शकतील अन्यथा फक्त कोणाचे तरी पैसे वसूल करून देण्यासाठी किंवा राजकीय अजेंठा पुढे नेण्यासाठी नेमणुक केली जाईल व ज्यांना कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नाही व ज्यांची पात्रता फक्त कोणचा तरी कार्यकर्ता आहे अशा लोकांचं प्रशासकीय मंडळ आदिनाथ वर आले तर ती लोक काहीही करून आपल्याला दिलेल्या वसुलीची जबाबदारी पार पाडतील.
अलिकडच्या काळात आशा प्रकारे कोणताही कारखाना चालवणे प्रशासकीय मंडळाला जमलेले नाही व तसे स्वप्न कोणी पाहू नये, प्रशासकीय मंडळाच्या तोंडाकडे बघून कोणी ऊस घालणार नाही व कोणी वाहतूकदार तोडणी करार करणार नाही. हे लक्ष्यात घेतले पाहिजे. ज्यांना कोणाला आदिनाथची सत्ता पाहिजे त्यांनी मागच्या दाराने असले उद्योग करण्यापेक्षा निवडणुकीला सामोरे जावे.