संघर्ष योद्धा उद्या करमाळ्यात ; सभेची जोरदार तयारी
करमाळा समाचार – संजय साखरे
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची उद्या दुपारी चार वाजता करमाळा तालुक्यातील दिवेगव्हाण येथे जाहीर सभा होणार असून या सभेची जोरदार तयारी मराठा समाज बांधवाकडून करण्यात येत आहे.

करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील दिवेगव्हाण या गावाने नुकतेच लोक वर्गणीतून एक कोटी रुपयांचे श्री विठ्ठल रुक्मिणीचे भव्य मंदिर उभारले आहे. त्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कळशारोहण सोहळा नुकताच संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्त परायण कान्होबा महाराज देहूकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
दिवेगव्हाण येथील सुमारे 70 एकर क्षेत्रावर या सभेचे नियोजन करण्यात आले असून दिवेगव्हाण येथील समाजबांधव गावोगावी जाऊन बैठका घेऊन या विषयी जनजागृती करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण व सागेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर उद्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
