शेतीसाठी आणि पिण्यासाठी मांगी तळ्यातुन उन्हाळी आवर्तन – आ. शिंदे
प्रतिनिधी – करमाळा
यावर्षी पावसाळ्यात मांगी तलाव 100% भरल्यामुळे मांगी तलावांमधून ओव्हर फ्लो आवर्तन यापूर्वीच देण्यात आलेले होते. सध्या तलावांमध्ये उन्हाळ्यातही पुरेसा साठा उपलब्ध असल्यामुळे लोकांच्या मागणीनुसार डावा आणि उजवा कालवा या दोन्हींच्या माध्यमातून शेतीसाठी आणि पिण्यासाठी उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोडले असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.

मांगीतील पाण्याचे अतिशय काटेकोरपणे नियोजन केलेले असल्यामुळे उन्हाळ्यात शेतीसाठी मागणीनुसार 21 दिवसाचे आवर्तन देता येऊ शकेल अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेली आहे. या पाण्याचा फायदा मांगी , पोथरे, अर्जुननगर, भालेवाडी गावातील लोकांना होणार आहे.
दोन दिवसापासून डाव्या कालव्यातून 45 क्युसेकने पाणी सुरू केले असून मागणीनुसार उजव्या कालव्यातूनही पाणी सुरू केले जाणार आहे असे शाखा अभियंता इंगळे यांनी सांगितले. ज्या ज्या गावांमधून पाण्याची मागणी येईल त्या मागणीच्या क्षेत्राचा विचार करून संबंधित गावाला पाणी देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकांनी पाण्याविषयीची मागणी पाटबंधारे कार्यालयाकडे नोंदवावी असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपअभियंता श्री कुलकर्णी यांनी केले आहे .
