महिलेचा संशयास्पद मृत्यु ; पोलिसांचा तपास खुनाच्या दिशेने
करमाळा समाचार
शहरातील विवाहित महिलेचा आज संशयास्पद मृतदेह फंड गल्ली येथे मिळून आला. यावेळी दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली. परंतु संबंधित महिलेच्या डोक्याच्या मागील बाजूस मोठी जखम असल्याने नेमका मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट झाले नाही. परंतु उपजिल्हा रुग्णालय येथे मृतदेह आणल्यानंतर नातेवाईकांनी महिलेस तीच्या पतीने मारले असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. सदर प्रकार दुपारी साडेचार च्या सुमारास घडला आहे.

उमा प्रफुल पवार (वय ३५) असे संबंधित महिलेचे नाव आहे. आत्महत्या झाल्याची माहिती समजताच करमाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आला. तेव्हा महिलेच्या माहेरकडील मंडळीने आक्रोश करत याची सखोल चौकशी करा, अशी मागणी करत हा खून असल्याचा आरोप केला. यावेळी घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक सागर कुंजीर, एम. एन. जगदाळे यांनी भेट दिली. रात्री उशीरा पर्यत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. दरम्यान श्री पाटील यांनी फॉरेन्सिक विभागाला बोलवण्याच्या सुचना दिल्या आहेत.

महिलेचा पती प्रफुल पवार हा कायम दारुच्या नशेत वाद घालत असल्याची माहीती आसपासच्या लोकांनी दिली. शिवाय पवार यांचा मुलगा लहान असुन तो आईच्या मृत्युला पप्पाच जबाबदार असल्याचे सांगत होता. तर मृत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी देखील ही आत्महत्या नसुन उमाला मारले असल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी मारहाण करीत असल्याने तीला माहेरी पण नेले होते. तर वडीलांच्या दारुच्या सवई मुळे मुलगाही मोहोळ येथील मामाच्या घरी राहत होता. रात्री बराच उशीर पर्यत पोलिस कसुन तपास करीत होते. प्रथम दर्शनी डोक्यात मार लागुन उमा मयत झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तरी नेमके काय घडलेय हे शवविच्छेदन झाल्यावर कळेल असे पोलिसांनी सांगितले आहे.