करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी ? – नव्या निवडीवरुन भाजपाचा बाहुबली नेता ठरणार !

करमाळा समाचार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात भाजपच्या वतीने दोन वेगवेगळे गट सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक असल्याचे चर्चांना जोर चढला आहे. तर विद्यमान खासदारही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. यानिमित्ताने तालुक्यात दोन्ही नेत्यांचे दौरे वाढले आहेत. त्यातच आता नव्या तालुका अध्यक्षाच्या निवडी होऊ घातल्या आहेत. त्यात नेमका कोणाचा वर्चस्व राहणार यावर येणाऱ्या निवडणुकात तिकीट कोणाच्या पारड्यात पडू शकते याचा अंदाज येऊ शकतो.

करमाळा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या भाजपा तालुका अध्यक्ष पदावरील कार्यकाल दोन टर्म पूर्ण केला असून भाजपा नियमाप्रमाणे एका सदस्यास दोन पेक्षा अधिक टर्म कार्यकाल उपभोगता येत नाही. त्यामुळे आता चिवटे यांच्या ऐवजी दुसऱ्या पदाधिकाऱ्याची निवड होणार हे निश्चित असले तरी यासाठी दोन्ही गटातून वेगवेगळे सदस्य इच्छुक आहेत. उघडपणे दोन्ही गट एकच असल्याचे दोन्ही बाजूने सांगण्यात येत असले तरी कार्यकर्त्यांमध्ये झालेली विभागणी लपून राहिलेली नाही.

यापूर्वी तालुक्यात वेगवेगळे गट असले तरी प्रत्येकाला वेगवेगळे काम पक्षाने दिले आहे तो आपले काम पूर्ण करत आहे असे म्हणत तालुक्यातील गटातटाचे राजकारण लपून ठेवण्यात यश आले होते. परंतु आता लढाई मात्र लोकसभेच्या उमेदवाराची आहे. त्यामुळे तालुक्यात दोघांनीही विशेष लक्ष दिल्यामुळे प्रत्येक निवडीत कोणाचा वर चष्मा राहील यावर होऊ घातलेल्या निवडणुकीत संबंधित नेत्याला तिकीट मिळणे शक्य होऊ शकते.

लोकसभेचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे करमाळा दौऱ्यावर आल्यानंतर भाजपाचे मोहिते पाटील समर्थक हा खासदारांच्या दौऱ्यापासून थोडासा अंतर ठेवून असतो. तर धैर्यशील मोहिते पाटील हे करमाळ्यात आल्यानंतर निंबाळकर समर्थक भाजपा कार्यकर्ते हे सदर बैठकांपासून अलिप्त राहतात. यामुळेच दुरून भाजपात सर्वकाही अलबेल म्हटले जात असले तरी तसे नक्कीच नाही हे सध्या तरी दिसून येत आहे.

भाजपाच्या नव्या तालुकाध्यक्ष पदासाठी सध्या करंजे सरपंच काका सरडे, उपसरपंच वाशिंबे अमोल पवार, अजिनाथ सुरवसे, माजी तालुकाध्यक्ष शशिकांत पवार, सरचिटणीस सुहास घोलप, सरचिटणीस अमरजीत सांळुखे आदींची नावे चर्चेत आहेत. यापैकी कोणाच्या गळ्यात तालुकाध्यक्ष पदाची माळ पडते याकडे लक्ष लागून राहणार आहे. दोन्ही गटात पैकी कोणाच्या समर्थकाला सदरची संधी मिळते यावर एक प्रकारे संबंधित नेत्याचा विजय ठरणार आहे. असे असल्याने भाजपा पक्षश्रेष्ठी यातून नवा तालुकाध्यक्ष निवडणार का वेगळ्याच नावाला संधी देणार हे पाहिले जाईल.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE