करमाळा तालुक्यातील बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करा
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील विना परवाना वैद्यकीय व्यवसाय करणार्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन करमाळा मेडिकोज गिल्ड या संघटनेच्या वतीने आज महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना देण्यात आले.

या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, करमाळा तालुक्यात बोगस डॉक्टरांनी उच्छाद मांडला असून त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे .कोरोना काळात अनेक बोगस डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. याशिवाय अनेक डॉक्टरांनी अवैध गर्भपात केल्यामुळे अनेक महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही काही उपयोग होत नाही. सदर बोगस डॉक्टरांना गाव गुंडा चे अभय असून ते कोणालाही जुमानत नाहीत या उलट तक्रारदार विरुद्ध अरेरावीची भाषा वापरतात. त्यामुळे आपण या प्रकरणात तातडीने लक्ष घालून बोगस डॉक्टरांविरुद्ध लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत व करमाळा तालुक्यातील निष्पाप नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवावा असे या निवेदनात म्हटले आहे.
