विशेष लेख – “शिक्षक – एक कोविड योद्धा” शिक्षकांची अवहेलना देशाची अधोगती
करमाळा समाचार – विशेष लेख

भारतरत्न नेल्सन मंडेलांनी म्हटलंय की ,” जर तुम्हांला एखाद्या देशाला उद्ध्वस्त करायचं असेल तर बॉम्ब टाकून देश उद्ध्वस्त होणार नाही,पण तर त्या देशाची शिक्षण व्यवस्था उध्वस्त केली तर तो देश नक्कीच उध्वस्त होईल.” “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा” अशी गुरूची महिमा गाणारी भारतीय संस्कृती! गुरुंना अमाप असा आदर होता. परंतु आता शिक्षणाप्रती सरकारचा आणि समाजाचा दृष्टिकोन बदललेला आहे. ‘ आज मागता येत नाही भिक म्हणून मास्तरकी शीक’ अशी अवस्था शिक्षणाची झालेली आहे.

आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग व महसुल विभाग यांची कामे शिक्षक करताना तरीही एकेकाळी गावातील कोणत्याही महत्त्वाच्या कामात कार्यक्रमांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा शिक्षकाची जाणीवपूर्वक आज अवहेलना होताना दिसते. कोणीही उठावं त्याच्या पगारावर बोलावे, तुम्हाला काय काम असत?? तुमचे काय बाबा मज्जा आहे उन्हाळ्याची दिवाळीची सुट्टी, काही काम न करता एवढा पगार?? समाजात असे जाणीवपूर्वक सर्रास खोचकपणे बोलताना दिसतात.
गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग अत्यंत मोठ्या मोठ्या महामारीशी झुंजत आहे.हा काळ अत्यंत दुष्कर असला तरी शिक्षकाला कोणत्याही गोष्टीतून मार्ग काढण्याची सवय असतेच ! जुन महिन्यात शिक्षक आणि शिक्षणक्षेत्रही थोडं गोंधळलेलंच होतं. अध्यापन -अध्ययन कसे करायचे? यातून मार्ग कसा काढायचा या विवंचनेत विद्यार्थी-पालक समाज असताना यावर मात करत शिक्षकाने टेक्नोसॅव्ही बनून संगणकाचे धडे गिरवत- गिरवतचविद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग खुला केला आणि ज्ञानार्जनाला हा नवा पर्याय मिळाला. झुम, गुगल मिटींग , पीपीटी तयार करणे, प्रोजेक्ट घेणे, अॕक्टिव्हिटी घेणे, गुगल फॉर्मचा उपयोग करून प्रश्नपत्रिका तयार करून सराव घेणे, गृहपाठ देणे- तपासणे, तर काही शाळांनी शाळेत राबवले जाणारे सर्व उपक्रम ऑनलाईन घेतले.शिक्षक इथे राब राब- राबत होता. तेही स्वेच्छेने, आनंदाने ! शिक्षकांसाठी ही तारेवरची कसरत होती. खरंतर कितीतरी पळवाटा होत्या पण शिक्षकांची ही “जमातंच” मुळी प्रामाणिक ! त्यामुळे विद्यार्थ्यांप्रतीच्या कळकळीने, जिव्हाळ्याने आणि त्याला परिपूर्ण शिक्षण या कठिण काळातही लाभावे म्हणून त्यांनी कसलीही पर्वा न करता अध्यापनाचे कार्य सुरूच ठेवले.
सर्व सुविधांनी सुसज्ज शाळांसाठी ऑनलाईन शिक्षक हे अगदी सहज साध्य होते पण वाड्या-वस्त्या वरील दुर्गम भागातील,तळागाळातील विद्यार्थ्यांच्या झोपडपट्ट्यांतील शाळा, गावाकडील शाळा, यांना हे शिक्षण दुरापास्त होते. यावरही शिक्षकाने मात केली. हवेली तालुक्यातलं सिंहगड खोऱ्यातील न्यु इंग्लिश स्कूल खामगाव मावळ विद्यालयातील शिक्षकांनी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षण पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना मंदिरात एखाद्या शेडमध्ये जशी जागा उपलब्ध होईल तसे सर्व सरकारी नियमांचे पालन करून अध्यापन केले. दुर्गम आणि डोंगरी भागात जिथे अनुसूचित जमाती विमुक्त शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या पालकांना एक वेळच्या अन्नाची जिथे वनवन तिथे मोबाईल आणि ऑनलाइन शिक्षण कसे पोहोचणार? यावर पर्याय काढत येथील शिक्षकांनी *शाळा आपल्या दारी* हा उपक्रम गेली वर्षभर यशस्वीपणे राबवला आणि विद्यार्थ्यांना हसत- खेळत मर्यादित कालावधीत शिक्षण देऊन एक नवा आदर्श उभा केला. हे एक प्रातिनिधिक उदाहरण झाले. अशा कितीतरी शाळा आणि कितीतरी शिक्षक ऊन वारा पाऊस थंडी ची पर्वा न करता घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करताहेत . कितीतरी विद्यार्थ्यांकडे स्वतः चे मोबाइल नव्हते. पालकांच्या वेळा अॕडजेस्ट करून आपला दिवसभराचा वेळ विद्यार्थ्यांसाठी दिला.

विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी तळमळीने शिक्षणाचा हा झरा वाहता ठेवला. शिक्षकाचा “अध्यापन” हा आत्मा, तसंच वर्गातला विद्यार्थीही जीव की प्राणच ! म्हणून या ऑनलाईन शिक्षणात शिक्षकाचा जीव तितकासा रमत नाही. तरीही तो विद्यार्थ्यांसाठी जणूकाही वर्षभर खडतर तपश्चर्या करीत आहे.
या शैक्षणिक कामाबरोबरच डॉक्टर, नर्स आणि पोलीस यांच्यासोबतच शिक्षकही पहिल्या दिवसापासून कोरोनाची लढाई लढत आहेत.
पोलीस खात्यावर ताण येतो म्हणून चेक पोस्टवर सहाय्यक म्हणून काम करायला शिक्षक बांधव आनंदाणे तयार.
पोलिसांसोबत चेकपोस्टवर तपासणी करणे, आरोग्य खात्यावर ताण येतो म्हणून सहाय्यक कोण?? तिथेही शिक्षकच कोणत्याही प्रशिक्षणा शिवाय उभा ठाकला. एक सॅनिटायझर ची बाटली आणि एक हॅन्डग्लोव्स जोड घेऊन शिक्षक प्रति डॉक्टर म्हणून प्रत्येक घरी जाऊन ऑक्सिजन आणि शरीराचे तापमान तपासणी करू लागला.बाहेरून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करणे, विलगीकरण कक्षात निरीक्षक म्हणून काम पाहणे, आरोग्य केंद्रांवरील ड्युटी करणे अशा अनेक आव्हानांना सामोरे जाऊनही दुसरीकडे आपल्या विध्यार्थ्यांच्या शिक्षणाचे धडेही कायम ठेवत त्यांचे शिक्षणही सुरु ठेवले.
आणि अशा सर्व कसरती एकहाती करूनही शिक्षक नावाचे कोविड योद्धे दुर्लक्षितच राहिले.कितीतरी शिक्षकांनी पोलिसांना म्हणून टोलनाक्यांवर, रेल्वे स्टेशनवर, रेशनिंगच्या दुकानाबाहेर, हॉस्पिटल्समध्ये अशा अनेक ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून सेवा केली. यातच निवडणुकीच्या कामासाठीही शिक्षकांच्या नियुक्त्याही झाल्या. जिथे -जिथे शक्य आहे तिथे -तिथे शिक्षक हजरच होता.
अनेक यामध्ये अनेक शिक्षकांना आपला जीवही गमवावा लागला. काहींना टोल नाक्यावर एखाद्या गाडीने उडवले, काही ड्यूटीवरुन परतताना अपघाती निधन पावले काही शिक्षकांना हॉस्पिटल आणि सर्वेच्या या कामांमध्ये कोरोनाची लागण होऊन अनेक शिक्षकांचे निधन झाले.त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबामध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही न भरून निघणारी आहे.कोरोना पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी विविध घटक आपल्या परिने कर्तव्य निभावत असताना यामध्ये देशातील शिक्षकही राष्ट्र कर्तव्याला प्रथम प्राधान्य देऊन डॉक्टर आणि पोलिसांच्या खांद्याला खांदा देत मागे नाहीत.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाबरोबरच माध्यमिक व उच्यमाध्यमिक विद्यालयातील शिक्षकसुद्धा कोणत्याही अतिरिक्त कामाचे ओझे विनातक्रार कर्तव्य म्हणुन पार पाडणारे शिक्षकवृंद या अपत्तीप्रसंगीही स्वतःला झोकून देऊन कर्तव्य निभावताना दिसत आहेत.
साहजिकच एकदम या सर्व गोष्टी एकत्रितपणे कराव्या लागल्यामुळे त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण आला .कितीतरी शिक्षकांना मानसिक, शारीरिक व्याधींना तोंड द्यावे लागले. तरीही एखाद्या कोव्हीड योद्ध्याप्रमाणे शिक्षकांनी ही खिंड यशस्वीरीत्या लढवलीयात सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्री शिक्षकांचाही समावेश होता. एखाद्या रणरागिणी प्रमाणे त्यांनी कोरोना काळात नेमून दिलेल्या ड्युटीज पार पाडल्या. “कोमल हू कमजोर नाही” हेच जणू त्यांनी दाखवून दिले. कोरोनाची भीषण परिस्थिती असतानाही घरातील सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडून ह्या स्त्री शिक्षिका रणधुरंधर स्त्रियांसारख्या ‘कोरोना” ड्युटीवर जाऊन आपले कर्तव्य बजावत होत्या.
प्रामाणिकपणा आणि विश्वासूपणा या गुणांच्या बळावर आजवर शिक्षणक्षेत्रातील सेवा जशी तो बजावत आला तसाच या अशैक्षणिक कामांमध्येही सर्व शिक्षक शिक्षिका तेवढय़ाच समरसतेने काम करत आहेत. महत्वाच म्हणजे एवढं करूनही काही दिवसापूर्वी एक जण शिक्षकांबद्दल खुप खालच्या व गलीच्छ भाषेत शिक्षकांबद्दल लिहतो, छापतो अशा लोकांना चौकात घेऊन आहेर दिला पाहीजे. काल परवा एक व्हिडिओ शिक्षकांच्या काम न करता पगार असं काही अभद्र बोलणाऱ्या इसमाचा एक व्हिडिओ पाहण्यात आला.
त्या वेळी हेही सांगणे गरजेचे ठरते की राष्ट्रीय आपत्ती आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या मासिक पगारातील पंचवीस टक्के पगार कपात करून देणारा पहिला व्यक्ती शिक्षकच होता. तेंव्हा उघडा डोळे बघा नीट. बीएलओ ड्युटी शिक्षक , इलेक्शनची ड्युटी शिक्षक, जनगणनेचं काम शिक्षक, चेकपोस्टवर शिक्षक, शिधावाटप केंद्रांवर शिक्षक, घराघरात जाऊन सर्व्हे करणं शिक्षक, थर्मामीटर घेऊन ताप तपासणे शिक्षक, विलगीकरण इमारतींवर शिक्षक एवढं करूनही शिक्षक शासनाकडून, प्रशासनाकडून आणि समाजाकडूनही बेदखल अवहेलनेचा धनी ??? आणि एवढ होऊन देखील त्याने केवळ मान खाली घालून काम करायचं. कोणालाही प्रश्न विचारायचे नाहीत अन्यथा एकतर निलंबन किंवा गुन्हे दाखल होनार.
शिक्षकांची एवढी अवहेलना समाजाला आणि देशालाही परवडणारी नाही.माळी बनून विद्यार्थीरूपी रोपट्यांना ज्ञानरूपी पाणी घालणारे हे हात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता कोविड काळात कधी रस्त्यावर उतरून तर कधी शिक्षणाची धुरा आपल्या मजबूत बाहूंवर पेलून ज्ञानगंगा विद्यार्थ्यांच्या घराघरात नेऊन पोहचवीत आहेत.
आणीबाणीच्या काळातही स्वतःला प्रथमता आणि अंतिमतः भारतीय या मुल्याशी आणि संविधानाशी एकनिष्ठ राहत “सामाजिक आरोग्य,सलोखा, व “विद्यार्थ्यांची प्रगती”हाच सर्वात मोठा पुरस्कार मानणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला “कोव्हीड योद्धा” म्हणूनच गौरवायलाच हवे. तो त्याचा अधिकारच आहे. खरोखर शिक्षक हा कोविड योद्धाच आहे. He Deserved it. बस्स्स.
🖋️ राहुलकुमार चव्हाण ( शिक्षक )