रस्त्याच्या प्रश्नावरुन प्रशासन उदासीन ; खेळाडुंच्या आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर
करमाळा समाचार (karmala samachar)
करमाळा येथील दत्त मंदीर ते न्यायालय वादग्रस्त रस्ता जो हस्तांतरण अभावी रखडला आहे. याची जबाबदारी घेण्यासाठी कोणतेही कार्यालय तयार नसल्याने नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत. यातून ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक ही सुटलेले नाहीत. रोज या ठिकाणी जाणाऱ्या मालगाडी कोणत्या ना कोणत्या कारणाने नादुरुस्त होताना दिसत आहे. त्यामुळे रस्त्यावर धुळीसह वाहनांच्या रांगाच रांगा लागताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सदरच्या रस्त्यावर लवकरच वरिष्ठ दिवाणी न्यायालय सुरू होत असून याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

करमाळा तालुक्यातील इतर रस्त्याप्रमाणे करमाळा शहरातील दत्तमंदीर ते न्यायालय रस्त्याची ही दुरावस्था बघुन प्रशासनाचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आला आहे. बऱ्याच काळापासून माध्यमांमध्ये बातम्या येत असताना तसेच लोकांच्या, नेते मंडळींची आंदोलनाची भूमिका असतानाही याकडे कानाडोळा केला जात आहे. रस्त्याबाबत होत असलेल्या तक्रारी नंतरही रस्त्याचे काम मात्र पूर्ण केले जात नाही. त्याचा तोटा रोज कुठे ना कुठे होताना दिसत आहे.

मागील काही दिवसापूर्वी पिण्याचे पाणी वाहतूक करणारा ट्रकचा पाटा या ठिकाणी तुटल्याने हजारो लिटर पाणी सोडून द्यावे लागले होते. तर काही दिवसापूर्वी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा टायर फुटला पण सुदैवाने अपघात झाला नाही. तसाच आज पुन्हा ट्रॅक्टर ऊस वाहतूक करत असताना त्याचा टायर फुटल्याने बराच काळ वाहतूक खोळंबली होती. परिसरात कोणती दुर्घटना घडली नसली तरी रस्त्यावर मात्र धुळीसह मोठ्या रांगा लागल्या होत्या.
खेळाडूंच्या जीवितास धोका..
सदरच्या रस्त्यावर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय क्रीडांगण आहे. सायंकाळी शारीरिक व्यायामासाठी मुले तसेच वृद्ध लोक व काही नागरिक फिरण्यासाठी येत असतात. परंतु संपूर्ण मैदानाभर त्या रस्त्यावरील धुळीचे लोट येत असल्याने दुपारी चार नंतरच त्या मैदानावर काहीच दिसेनासे होते. ती धूळ श्वसनाद्वारे फुफुसात जाऊन भाविकाळात त्रास झाल्याचा दिसून येऊ शकते. तसेच सदरच्या रस्त्यावर नव्याने वरिष्ठ न्यायालय येत असतानाही या रस्त्याची दुरुस्ती होत नसेल तर हा अतिशय गंभीर विषय आहे.