उजनी जलाशयात वाहत आलेल्या मृतदेहाची ओळख पटेना ; तीन दिवसापासुन शोध सुरु
करमाळा समाचार
तालुक्यातील खातगाव क्रमांक तीन येथे उजनी जलाशयाच्या पाण्याच्या काठावर एका अनोळखी पुरुषाचे मृत शरीर मिळून आले होते. त्याचा तपास पोलिसांनी घेतला. तीन दिवस उलटले तरी अद्याप त्याची ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सदरचे शरीर दि २५ रोजी आढळले होते.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. तर उजनी जलाशयात मोठ्या प्रमाणावर पाणी साठा झालेला आहे. तसेच पाणी वाहते असल्याने जनावरे व इतर वस्तू वाहून येताना आढळून येतात. पण दि २५ रोजी एका तीस वर्षीय पुरुषाचे मृत शरीर वाहत खातगाव क्रमांक तीन या शिवारात आढळले आहे.

याप्रकरणी करमाळा पोलिसांनी तपास घेण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर व्यक्ती कोण आहे याची माहिती मिळू शकली नाही. मयताच्या अंगावर फक्त चॉकलेटी रंगाचा बर्मुडा व त्याच्या दोन्ही बायांवर इंग्रजी अक्षरात फुटबॉल असे लिहिलेले आहे. याव्यतिरिक्त त्याची कसलीही ओळख पटत नसल्याने संबंधित वर्णनाचा व्यक्ती हरवला असल्यास करमाळा पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.