करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

महायुतीचे गणीत बिघडले- एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत रंगत ; जगतापांच्या भुमीकेकडे लक्ष

करमाळा समाचार

राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या दोन्ही पक्षात फूट पडल्यानंतर करमाळा तालुक्यातील जवळपास सर्वच नेते महायुतीमध्ये सामील झाले होते. त्यानंतर लोकसभा निवडणूक एकतर्फी वाटू लागलेली असताना मोहिते पाटील यांना डावलल्याने बीजेपीने स्वतःच्या अडचणीत वाढ करुन घेतली आहे. मोहितेंनी घेतलेल्या निर्णयामुळे करमाळा तालुक्यातही परिस्थिती बदललेली दिसून येत आहे.

माजी आमदार नारायण पाटील हे मोहिते यांच्यासोबत गेल्याने बरेचसे चित्र या ठिकाणी बदललेले दिसेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. तर बाजार समिती निवडीवेळी माजी आमदार जगतापांना मोहितेंनी केलेलं सहकार्य त्यामुळे जगताप काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. तर या सगळ्या घडामोडीत युतीला फटका तर आघाडीला बळ मिळाल्याचे दिसत आहे.

शिवसेना फुटीनंतर माजी आमदार नारायण पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तर त्यावेळी बागल यांनीही नकळत शिंदे यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. परंतु बागल हे राजकीय पक्षापासुन अलिप्त राहून बागल गटाच्या माध्यमातून काम करत असल्याचे दिसून आले. दरम्यानच्या काळात रश्मी बागल यांनी भाजपात प्रवेश केला. तर अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. तर मागील लोकसभेच्या वेळी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी बीजेपीला पाठिंबा दिलेलाच होता. यामुळे जवळपास तालुक्यात सर्वच नेते महायुती सोबत असल्याचे दिसत होते.

ads

अशा परिस्थितीत करमाळा तालुक्यातून महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मते मिळून उमेदवार सहज निवडून येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तरीही जनतेतून मात्र फोडाफोडीच्या राजकारणाचा रोष कायम दिसून येत होता. नेते जरी एका बाजूला गेले तरी जनता त्या बाजूला जाईलच असे दिसून येत नव्हते. पण तरीही सर्वच नेते एका बाजूला गेल्याने सदरची निवडणूक ही एकतर्फी जाणवू लागली होती.

त्यातच मोहिते पाटलांचा गट कायम करमाळा तालुक्यात सक्रिय असतो. वेगवेगळ्या भागात त्यांचा गट कायम काम करताना दिसतो. शिवाय माजी आमदार नारायण पाटील हेही मोहिते पाटील समर्थक मानले जातात. त्यामुळे मोहितेंनी घेतलेल्या निर्णयामुळे पाटील त्यांच्यासोबत जाणे साहजिकच होते. मागील निवडणुकीत अपक्ष असतानाही तालुक्यात पहिल्या क्रमांकाचे मते मिळवणारे पाटील मोहितेंसोबत गेल्याने आता एकतर्फी वाटणारी करमाळा तालुक्यातील परिस्थिती बदलल्याचे दिसून येत आहे.

जगतापांच्या भुमीकेकडे लक्ष ..
बाजार समितीत जगतापांना मोहितेचे सहकार्य ..
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांना सहकार्य करीत मोहिते पाटील यांनी सर्व विरोधक एकत्र आणत बाजार समिती अविरोध करीत जगतापांच्या ताब्यात दिलेली आहे शिवाय त्यांचे वैयक्तिक संबंध पण चांगले आहेत. तर आता या लोकसभा निवडणुकीत पक्ष जो उमेदवार देईल त्याच्यासोबत राहण्याचं जरी जगताप यांनी सांगितलं असलं तरी पुढे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर त्यांचे थोरले सुपुत्र नगराध्यक्ष वैभवराजे जगताप सध्या महाविकास आघाडी सोबत तर धाकटे चिरंजीव शंभूराजे जगताप हे भाजपासोबत असल्याचे दिसत आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE