मातब्बर चिवटेंसमोर सामान्य कुटुंबातील चोपडेचे आव्हान तर काकु पुतण्याच्या लढतीने रंगत
करमाळा समाचार

प्रभाग क्रमांक ७ (ब) मध्ये एक लक्षणीय लढत पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मातब्बर उमेदवारसमोर सामान्य कुटुंबातील उमेदवार नशीब आजमावत आहेत. एकेकाळी नगराध्यक्ष पदाची माळ गळ्यात घातलेल्या सामान्य कुटुंबाविरोधात नितीन चोपडे व शिंदे सारखे उमेदवार मैदानात आहेत. या ठिकाणी शिवसेना भाजप समोरासमोर उभा ठाकले असून वैयक्तिक सामाजिक कार्य तसेच पक्षाच्या सहकार्याने चोपडे मोठे आव्हान उभे करू शकले असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय शिंदे यांनी घेतलेली भूमिका ही निर्णायक ठरू शकते.

प्रभाग क्रमांक सात ब मध्ये जयराज (सोनु )चिवटे यांचे बंधू युवराज चिवटे हे मैदानात उतरले आहेत. तर त्यांच्यासमोरच भाजपाकडून सामान्य कुटुंबातील चोपडे गुरुजींचा मुलगा नितीन चोपडे मैदानात उतरलेला दिसून येत आहे. मुळातच चोपडे कुटुंबीय राजकारणात नसतानाही मोठे धाडस करून भाजपाने चोपडे यांना उमेदवारी दिली. त्याठिकाणी घोलप, राखुंडे, चिवटे या मोठा लवाजमा असलेल्या नेत्यांच्या तुलनेत सामन्य कार्यकर्त्याला संधी देण हे एक प्रकारचे धाडसच पण त्या संधीचं सोनं करीत चोपडे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली व कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बलाढ्य अशा चिवटेसमोर आव्हान उभा करण्यात चोपडे यांना यश आले आहे.
जयराज चिवटे तसेच चिवटे कुटुंबीयांचे राजकारणातील स्थान मोठे आहे. अशा कुटुंबाला आव्हान देणं सोपं नव्हतं. तरीही नितीन चोपडे यांना सामान्य मतदारांकडून पोचपावती मिळू लागली व त्यांनी अधिक उत्साहाने काम करून निवडून येण्याचा चंग बांधलेला दिसून येत आहे. याचा कितपत फायदा चोपडे यांना होईल हे येणारा काळ ठरवेल. पण एक सामान्य कुटुंबातील युवकांनी घेतलेली झेप ही नक्कीच कौतुकास्पद आहे.

या परिसरात कानड गल्ली, राशिन पेठ, खंदक रोड, खडकपुरा व किल्ला वेस काही भाग असा हा मतदारसंघ असून या ठिकाणी चिवटे व चोपडे यांची संघर्षपूर्ण लढत होत असताना शिंदे कुटुंबातील पुष्पा शिंदे व जयदीप शिंदे हे काकू पुतण्याची जोडी मैदानात आहे. सावंत गटाकडून पुष्पा शिंदे या मैदानात असल्याने त्यांनाही विजयाच्या अपेक्षा आहेत. तर कोणत्याही पाठबळाशिवाय केवळ वडिलांच्या सामाजिक कार्याच्या आधारावर जयदीप शिंदे मैदानात उतरलेला असून त्याला युवकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यामुळे या ठिकाणी होत असलेल्या लढतीची चर्चा शहरभर सुरू आहे.

