राजुरीच्या दाम्पत्याची आगळी-वेगळी भक्ती ; सातासमुद्रापार केली गणरायाची प्रतिष्ठापना
प्रतिनिधी -संजय साखरे
करमाळा तालुक्यातील राजुरी येथील महेश शिंदे व सौ.कोमल शिंदे या दाम्पत्याने श्री गणरायाच्या प्रतिष्ठापनेचा एक आगळा-वेगळा उपक्रम दक्षिण कोरियातील सेऊल या शहरात राबवला आहे.

नोकरी निमित्त हे दांपत्य दक्षिण कोरियातील सेऊल या ठिकाणी वास्तव्यास आहे .त्यांनी त्यांच्या राहत्या घरी पर्यावरण पूरक गणपती मूर्ती तयार करून त्याची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करीत गणेश उत्सव साजरा केला .त्यांच्या या अभिनव उपक्रमात सेउल शहरात वास्तव्यास असणारा त्यांचा मित्रपरिवार देखील सहभागी झाला होता.

दक्षिण कोरियात गणेश मूर्ती सहज उपलब्ध होत नसल्यामुळे सौ कोमल यांनी स्वतः मातीपासून गणेशमूर्ती बनवली. सजावटीसाठी त्यांनी “ओरीगामी” कौशल्याचा वापर केला व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून सातासमुद्रापार धार्मिक भावना जोपासली.
मराठी मंडळ कोरिया तर्फे दरवर्षी सामुहिक गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. सर्व मराठी बांधव एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात. गेल्या वर्षीपासून कोरोना मुळे हा गणेशोत्सव साजरा करता आला नाही, म्हणून आम्ही घरीच गणेशोत्सव साजरा केला.
महेश विष्णू शिंदे,
कोरिया