मुख्याधिकाऱ्यांचे अतिक्रमण धार्जिण धोरण ; एकाच रस्त्यावरुन गोंधळ दुसरीकडे मुग गिळुन गप्प
करमाळा समाचार
सध्या करमाळा शहरात देवीचामाळ रस्त्यावरील अतिक्रमणाचा विषय चांगलाच गाजला आहे. या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे व संबंधित ठिकाणी असलेले भाजी विक्रेते यांच्यामध्ये झुंपलेली दिसून येते. तर त्यांची बाजू घेत सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांनीही मैदानात उडी घेतली आहे. परंतु संबंधित ठिकाणी असलेल्या रस्ता सोडून नगर परिषदेला गावभरात झालेले अतिक्रमण का दिसत नसावे ? हा मोठा प्रश्न आहे. मोकळ्या जागेत व उघड्या पद्धतीने दुकाने थाटलेली परिषदेला चालत नाहीत. पण अवैधरित्या बांधकाम केलेली चालतात हे मुख्याधिकाऱ्यांचं धोरण न समजण्या पलीकडे आहे.

शहराअंतर्गत रस्ते हे छोटे असून या भागात मोठ्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याचे दिसून येतात. रस्ता लहान असतानाही समोर कट्टे तसेच विविध ठिकाणी केलेले अवैधरित्या बांधकामे यामुळे बऱ्याच वेळा अडचणी निर्माण होतात. खाजगी जागांना अडथळा होत असताना झालेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष व गावात प्रमुख रस्त्यावरून रहदारीचा विषय बऱ्याच वेळा चव्हाट्यावरही आला आहे. परंतु नगरपरिषद उचित पावले उचलताना दिसत नाही.

यासंदर्भात विचारणा केली असता जोपर्यंत कोणती तक्रार येत नाही तोपर्यंत कार्यवाही होणार नसल्याचे सांगण्यात येते. म्हणजेच उद्या कोणी नगरपरिषदेसमोर जरी बांधकाम केली तरी जोपर्यंत तक्रार येत नाही तोपर्यंत नगरपरिषद काहीच करणार नाही ही धोरण नगरपरिषदेचे असल्याचे दिसून येते. मुळातच अशा प्रकारच्या अवैध बांधकामांची माहिती घेऊन त्यावर हातोडा चालवणे हे नगरपरिषदेचे काम आहे. परंतु गावात चहुबाजूने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढत असताना संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. यामध्ये आर्थिक देवाण-घेवाण तरी नाही ना ? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. केवळ एकाच रस्त्यावरून अतिक्रमणाचा गोंधळ घालण्यापेक्षा बांधकाम विभाग व नगरपरिषदेने संपूर्ण शहरातील अतिक्रमण कडे कधी लक्ष देणार हा मोठा प्रश्न आहे.
सध्या ज्या रस्त्यावर अतिक्रमणाचा वाद सुरू आहे तो रस्ता यापूर्वी सध्या असलेल्या रस्त्याच्या तीन पट लहान होता. तरीही असा गोंधळ यापूर्वी कधी पाहायला मिळाला नाही. परंतु आता जवळपास तिपटीने रस्ता वाढूनही या रस्त्यावर अनेक अडथळ्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे आरोप केले जात आहेत. नगरपरिषदेला ही आता या ठिकाणी अतिक्रमणे दिसू लागली आहेत. मग गावात मोठ्या लोकांनी अवैधरित्या केलेली बांधकामे नगरपरिषद त्याकडे लक्ष देणार का ? चौकातील कट्टे प्रमुख बस स्थानक, प्रमुख रस्ता, जेऊर रोड, राशीन रोड, नगर रस्ता या भागातील अतिक्रमणे कधी काढणार का त्या ठिकाणाहून चिरीमिरी भेटत असल्यामुळे सर्वत्र शांतता आहे.