आपल्यानंतर पत्नीला रुढी परंपरांचा त्रास होऊ नये म्हणुन सामाजीक कार्यकर्त्याचे पहिले पाऊल
करमाळा समाचार
अनिष्ट प्रथांमुळे विधवांना उर्वरित आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागतो. ती वेळ आपल्या पत्नी वर येऊ नये म्हणून तालुक्यातील पोथरे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी या सर्व बंधनातून पत्नीला मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत तहसीलदारांना १०० रुपयांच्या बॉंडवर प्रतिज्ञापत्र देत आपल्या मृत्यूनंतर पत्नीवर अनिष्ट रुढी-परंपरा लादु नये असे लिहले आहे. तर अशी मागणी करणारे झिंजाडे हे देशातील पहिले पती आहेत.

नवरा मयत झाल्यानंतर विधवा महिलेचे कुंकू पुसले जाते, बांगड्या फोडतात, अलंकार काढून घेतात, सणावाराला मान देत नाहीत अशा अनेक अनिष्ट रूढी परंपरा प्रथा आजही आपल्या समाजात आहेत. यामुळे जग जरी बदलत असली तरी महिलांवर होणारे अन्याय अत्याचार हे कमी झालेले नाहीत. त्यामुळे या सर्वांना मोकळी वाट देत आपण हा निर्णय घेतल्याचे झिंजाडे यांनी जाहीर केले.

लग्नाच्या ४४ वर्षानंतर आपल्या सुखी संसारातून भावी काळात आपल्यानंतर पत्नीला समाजाकडून रूढी परंपराचा होणारा त्रास टाळण्यासाठी प्रमोद झिंजाडे (वय ६४) यांनी पत्नी अलका हिस जुन्या रूढी व परंपरा न पूर्ण मुक्त केले आहे. झिंजाडे यांना दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. सर्व मुले उच्चशिक्षित असून सर्वांची लग्नही झालेली आहेत.
याबाबत बोलताना झिंजाडे म्हणाले, मी सतत कामानिमित्त बाहेर असल्याने मुले लहान असताना शिक्षण, आरोग्य व देखरेख यासाठी कोणत्याही प्रकारची तक्रार न करता पत्नी अलकाने माझी साथ दिली. पत्नी माझ्यानंतर एकाकी पडू शकते. तिला समाजात वेगळे पाडले जाऊ शकते. या रूढी-परंपरा अनिष्ट असून या थांबल्या तर तिलाही इतरांप्रमाणे सर्व सणवार साजरे करता येतील. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेता येईल, सन्मानाने वागता येईल. त्यामुळे आपण हा निर्णय घेतला आहे.
याबाबत रत्नागिरी येथील यशदा प्रशिक्षक वैदेही सावंत यांनी विधवा सन्मान कायदा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर विधवा महिला सन्मान कायदा अभियानामध्ये एम. एन. कोंढाळकर, कालींदी पाटील, राजु शिरसाट यांची साथ आहे.