तालुक्यातील प्रमुख आठ कार्यालयांचा कारभार चालतो प्रभारींच्या भरोसे
करमाळा समाचार
एकीकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेवरील लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकाल संपला आहे. तर बऱ्याचशा ग्रामपंचायतीचे कार्यकाल संपल्याने तिथेही प्रशासक नेमण्यात आले आहेत. अशी परिस्थिती असताना संपूर्ण कारभार ज्या अधिकाऱ्यांच्या हाती सोपवला गेला. तेच अधिकारी आता वेगवेगळ्या कारणाने पदावर नसल्याने करमाळा तालुका प्रभाऱ्यांच्या हातात गेल्याचे दिसून येत आहे. तर जवळपास आठ अधिकारी प्रभारी काम पाहत असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये प्रांत, तहसिलदार अशी प्रमुख पदेही आहेत.

प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सहाय्यक निबंधक, मुख्याधिकारी, उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा या ठिकाणी सर्व प्रभारी आहेत तर भुमी अभिलेख येथील उपअधिक्षकांना करमाळा व बार्शीचा चे काम पाहवे लागत आहे. या पदावरील प्रत्येक व्यक्ती संपूर्ण तालुका व्यवस्थित रित्या काम करण्यासाठी सक्षम व उपलब्ध असावा लागतो. त्यातील एक जरी अधिकारी उपलब्ध नसेल तर सर्व नियोजन बिघडते. तर करमाळा तालुक्याची इतकी वाईट परिस्थिती झाली आहे की यातील एकही अधिकारी उपलब्ध नाही. प्रत्येकाच्या जागी प्रभारी अधिकारी काम पाहत आहेत.

प्रांत अधिकारी ज्योती कदम यांची १७ एप्रिल रोजी बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी प्रशिक्षणार्थी समाधान घुटुकडे हे करमाळा येथील विभाग पाहत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यालाच आता इतरांना मार्गदर्शन करावे लागत आहे. तर तहसीलदार समीर माने यांची १३ एप्रिल रोजी बदली झाली आहे. त्यांच्या जागी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव हे काम पाहत आहेत. गटविकास अधिकारी मनोज राऊत हे ३ जुलै पासून सुट्टीवर आहेत. त्यांच्या जागी सहाय्यक गटविकास अधिकारी राजाराम भोंग हे काम पाहत आहेत.
सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरी हे २२ जून रोजी बदली होऊन गेले आहेत त्यांच्या जागी माढ्याचे निबंधक सुधाकर लेंडवे यांच्याकडे प्रभार दिला आहे. तर मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांची २७ जुन ला बदली झाली आहे. त्यांच्या जागी कुर्डुवाडीचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्याकडे प्रभार दिला आहे. मागील पाच महिण्यात पाणी पुरवठ्याचा प्रभारी चार्ज सुद्धा बदलण्यात आला आहेसध्या अजित वाघमारे मागील दोन महिण्यापासुन प्रभारी आहेत.
बांधकाम विभागाचा प्रभार तर शाखा अभियंत्याकडेच दिला आहे. सहा जुन पासुन श्री गायकवाड काम पाहत आहेत. तर काही दिवसांपुर्वी करमाळ्याच्या भुमिअभिलेख अधिक्षक म्हणुन आलेल्या प्रिया पाटील यांना करमाळ्यासह बार्शीचाही कामाचा ताण आहे. त्यामुळे करमाळा सध्या प्रभारीवर अवलंबून आहे असे दिसून येत आहे. प्रमुख अधिकाऱ्यांशिवाय कामकाज कसे चालत असेल हे न बोललेलेच बरे.
प्रांत, तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, सहाय्यक निबंधक, बांधकाम उपअभियंता जिल्हा परिषद, उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा हे सर्व प्रभारी तर उप अधिक्षक भुमी अभिलेख करमाळा यांच्याकडे दोन तालुक्यांचे काम अशी परिस्थिती आहे. तर तालुक्यात केवळ पोलिस अधिकारी वगळले तर बरेच प्रमुख पदे हे प्रभारी हाताळत आहेत.