निवडणुकांमध्ये वाहीला पैशाचा पुर तरीही बदलला नाही मतदारांचा सुर
करमाळा समाचार – विशाल घोलप

निवडणुका म्हणलं की पैशांचा खर्च व पैशावर मतदान विकत घेऊन निवडणूक जिंकली जाते असे चित्र बऱ्याच वेळा पाहायला मिळतं. पण आता यालाही अपवाद असल्याचे करमाळ्यातील जनतेने दाखवून दिले आहे. पैसा तर वाटला गेला अशा चर्चा तर आहेतच. पण ते करत असताना जनतेच्या मनातील नगरसेवक निवडून देत नागरिकांनी करमाळा कसा वेगळा आहे हे दाखवून दिले आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये पैशाचा विजय न होता लोकशाहीचा विजय झाल्याचे चित्र असल्याची चर्चा रंगू लागल्या आहेत.

निवडणुकांमध्ये पैसा वाटला जातो आणि सर्वच गटाकडुन वाटला जातो हे जगजाहीर सत्य आहे. विशेष म्हणजे घेणाऱ्यामध्ये केवळ गरीबच मतदार असावेत असा नियम पण नाही. चांगले सुशिक्षित मतदारही पैसे देणाऱ्यांची वाट पाहुन असतात याचा अनुभव प्रत्येक गटाच्या उमेदवाराने अनुभवला असावा. विशेष म्हणजे वाटप करणारा कार्यकर्ता पण एकाच गटाचे पैसे देईल याचीही शाश्वती नाही. त्यामुळे यात मतदारांचा फायद्यासह आपला फायदा कसा होईल याचा अनुभव संबंधित कार्यकर्त्याला आलेला आहेच.
निवडणूक जाहीर झाली की पक्षाकडुन उमेदवारांची चाचपणी सुरु होते. प्रत्येक जण योग्य उमेदवार देण्याचा प्रयत्न करतो. तर उमेदवारी जाहीर झाली की लोक ठरवतात कोण योग्य व कोण अयोग्य त्यामुळे लोकांच्या मतावर पुन्हा पैसा, प्रचार व दबाव प्रभाव टाकत नाही. गोपणीय मताचा अधिकार ते बजावतात हा नियम आहे. पण सगळीकडेच असे होईल असे नाही. करमाळ्याने मात्र हे करुन दाखवले आहे. ज्या पद्धतीने सुरुवातीपासुन वारे वाहत होते ते मतपत्रिकेतही दिसुन आले आहे. म्हणजे जे पडले त्यांनी पैसे वाटले तरीही पडले असा अर्थ होत नाही. तर लोकांच्या मनात जे होते ते करुन दाखवले यात साम- दाम – दंड – भेद बदल करु शकले नाहीत असे दिसते.

या जनतेच्या लाटेत भला मोठा पैसा असणारा उमेदवार व पक्षही वाहुन जाताना दिसुन आला आहे. पैसा देऊन मते मिळवता येतात ही कल्पना धुळीस मिळाली आहे. त्यामुळे इथुन पुढे सगळ्याच गटानी पैसे वाटण्यापेक्षा कामातुन लोकांची मने जिंकावीत असे चित्र निर्माण झाले आहे. मोठ्या गटांसह छोट्या गटानीही पैशाचे अमिष दिले खरे पण गोपणीय पद्धतीने जनतेने दाखवले की मतदाराला राजा का म्हणाले गेलेय. इथुन पुढे पैसा आणि विजय हा विषय कमीत कमी करमाळ्यात दिसु नये ही अपेक्षा…

