बायकोला नांदवायला का पाठवत नाही म्हणत सासु सासऱ्याला मारहाण
करमाळा समाचार
तालुक्यातील पोंधवडी येथे बायकोला सासरी नांदायला का पाठवत नाही म्हणून सासू-सासर्याला मारहाण करून जखमी केले आहे. याप्रकरणी जावयासह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार 14 जुलै रोजी पोंधवडी येथे घडला आहे.

याप्रकरणी सौदागर वाघ यांनी तक्रार दिली आहे. तर बिभिशन मत्रे , देविदास मत्रे, पुष्पा मत्रे, सोनाली मत्रे सर्व रा. पोंधवडी यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सौदागर वाघ यांच्या मुलीचा विवाह गावातीलच बिभिशन मत्रे यांच्यासोबत झाला होता. सासरी पटत नसल्यामुळे सौदागर वाघ यांची मुलगी माहेरी पुन्हा आली होती. मागील दीड वर्षापासून ती माहेरीच राहत होती. तर तिने नवरा सांभाळत नाही म्हणून कोर्टात तक्रारही दाखल केली आहे.
याचा राग मनात धरून जावई व त्याचे कुटुंबीय यांनी सौदागर वाघ व त्यांच्या पत्नीला दगड व काठीने मारहाण करून जखमी केले आहे. त्यांच्यावर करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्यांच्या सांगण्यावरून चौघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.