करमाळासोलापूर जिल्हा

महिला स्वयंसहायता गटाच्या पदाधिकारी व सदस्यांचा प्रशिक्षण कार्यंक्रम

करमाळा समाचार 

“स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून महिलांनी आपला विकास करून घेतलेला आहे आणि घेत आहेत आपणही यामध्ये सहभागी व्हावे” असे प्रतिपादन नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक माननीय श्री नितीनजी शेळके यांनी केले ते महिला स्वयंसहायता गटाच्या पदाधिकारी व सदस्यांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करत होते” यावेळी निर्धार संस्थेचे श्री. सदा पांडव, सौ. अनुराधा राजमाने व उमेद अभियान करमाळाचे श्री. योगेश जगताप हे उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात मा. नितीन शेळके पुढे म्हणाले कि, स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून खूप चांगली कामे महिलांनी करून दाखवलेली आहेत. यामध्ये महत्त्वाचे आहे ती पंचसूत्री तसेच दशसूत्री. याचा वापर करून गट नियमाप्रमाणे चालवणे. जर गट अशा पद्धतीने चालले तर गट कधीही बंद पडत नाहीत. आणि गटाच्या माध्यमातून सर्व महिलांच्या अडीअडचणी सोडवता येतात, तसेच महिलांना उपजीविकेसाठी गटांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ घेऊन उद्योग व्यवसाय उभारणी देखील करता येते. व्यवसाया साठी लागणारे प्रशिक्षण नाबार्डच्या वतीने व निर्धार संस्थेच्या माध्यमातून निश्चितच दिले जाईल. नाबार्डच्या वतीने हा कार्यक्रम करमाळा येथे पाभर ऍग्रो प्रोडूसर कंपनीने आयोजित केला होता. या वेळी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निर्धार संस्थेचे सचिव श्री सदाशिव पांडव यांनी केले. निर्धार संस्थेच्या माध्यमातून गेली सतरा अठरा वर्षे महिला सक्षमीकरणाचे काम चालू आहे. आणि स्वयंसहायता गटाचे काम करत करत ऍग्रो प्रोडूसर कंपनीचे कामही आता सुरू करण्यात आलेले आहे यासाठी नाबार्डने सहकार्य केलेले आहे. पाभर ऍग्रो प्रोडूसर कंपनी ला सोलापूर येथील यशस्विनी ऍग्रो प्रोडूसर कंपनीच्या वतीने सहकार्य करण्यात येते.

आपल्या मार्गदर्शनात योगेश जी जगताप यांनी उमेद अभियान, विविध शासकीय योजना आणि महिलांचे सहकार्य याबाबत माहिती दिली. कार्यक्रम शासनाचे असले तरी आपल्यासाठीच आहेत. आपला विकास यातच आहे हे समजणे गरजेचे आहे. आता गटाची ही चळवळ खूप मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. उमेद च्या माध्यमातून गाव पातळीवर ग्राम संघाला मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य केलेले आहे. महिला गावोगावी ग्राम संघाच्या माध्यमातून व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

या कार्यक्रमासाठी पाभर ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षा सौ लता पांडव सचिव सौ. वर्षा सोनवणे तसेच संचालिका सौ. लक्ष्मीताई पोळ, सौ. अनुराधाताई कांबळे व सौ. उषाताई मेढे उपस्थित होत्या.

पाभर कंपनीच्या वतीने लवकरच गृहोद्योग सुरु करण्यात येणार असल्याचे सौ. अनुराधा राजमाने यांनी सांगून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ. कोमल पांडव तसेच रोहन कांबळे यांनी प्रयत्न केले.

कार्यक्रमाच्या शेवटी ‘जागतिक सतर्कता सप्ताह’ निमित्ताने भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत सर्व उपस्थतांनी शपथ घेतली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE