ओव्हरफ्लोचे पाणी कर्जतला मात्र करमाळ्याला ठेंगा ; आमदार संजयमामांनी व्यक्त केली नाराजी – जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन
करमाळा समाचार
कुकडी प्रकल्पातील अतिरिक्त पाणी मांगी तलावात सोडणे बाबत तसेच दहिगाव उपसा सिंचन योजनेला अतिरिक्त पाणी सोडणे बाबत करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे.
कुकडी धरण प्रकल्प सध्या 97% क्षमतेने भरले असून सध्या त्यातून अतिरिक्त झालेले पाणी वाहून जात आहे. हे पाणी कुकडी धरण प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे कर्जत तालुक्यातील गावांना सोडण्यात आले आहे. मात्र उजव्या कालव्याद्वारे ओव्हरफ्लोचे अतिरिक्त होणारे पाणी मांगीला सोडणे आवश्यक आहे. मांगी गावच्या प्रकल्पात सध्या 20 टक्के पाणी आहे. त्यामुळे पुढील नियोजनासाठी या तलावात पाणी सोडणे गरजेचे आहे. सध्या पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने यापासून तलावावर करमाळा तालुक्यातील 25 गावे अवलंबून आहेत. या गावांच्या पाझर तलावा खाली पोथरे, बिटरगाव खांबेवाडी करंजे, बालेवाडी या तलावावर अवलंबून आहेत. मांगी तलावाचे पाणी कमी झालेल्या या गावांवर पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी या बाबींचा विचार करता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रकल्पातील अतिरिक्त पाणी सोडण्या विषयी सिंचन मंडळ पुणे यांना आदेश करावे.
त्याचबरोबर दहिगाव उपसा सिंचन योजने खाली गुळसडी, पांडे, खडकेवाडी, कुंभेज ही गावे असून मागील उन्हाळी हंगामात दहिगाव उपसा सिंचन योजनेतील पाणी या गावांना मिळाले नव्हते. त्यामुळे गावांना प्राधान्य मिळावे सदरील भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने तसेच उजनी धरण 70 टक्के भरले असून या गावांचा पिण्याचा पाण्याचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झालेला आहे.. त्यासाठी दहीगाव योजने अंतर्गत संबंधित यांना पाणी सोडण्याचे आदेश द्यावे.