पर्यावरणीय ऋणानुबंध जोपासनारा रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
समाचार टीम
केम- श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम याठिकाणी एक राखी माझ्या झाडासाठी हा पर्यावरणीय ऋणानुबंध जोपासनारा रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री सागर दौंड अध्यक्ष व्यापारी संघटना केम , श्री आनंद शिंदे , श्री बाळासाहेब देवकर चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी, श्री दिपक तळेकर सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती, जेष्ठ शिक्षक श्री डी.एन.तळेकर हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी श्री दयानंद तळेकर अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती केम हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी या ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी लावलेल्या १५१ झाडांना व उपस्थित मान्यवर पाहुण्यांना कॉलेजमधील विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या. यावेळी या वृक्षांचे संगोपन व संरक्षण करण्याची विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.
यानंतर या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्री सागर दौंड यांनी या कॉलेजमधील विविध नवोपक्रमाचे कौतुक केले. वृक्षारोपण मोहीम व त्यांचे संवर्धन हे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित असलेले श्री आनंद शिंदे व श्री बाळासाहेब देवकर यांनी या कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या या पर्यावरणपूरक कार्यक्रमाचे कौतुक करून या कॉलेजच्या विकासकामांसाठी भविष्यात आपले सहकार्य राहील असे सांगून पुढील उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

यावेळी शालेय समिती अध्यक्ष श्री दयानंद तळेकर यांनी या कॉलेजमधील विद्यार्थिनींनी झाडांना राख्या बांधण्याचा हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य श्री एस.बी.कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ.मच्छिंद्र नागरे, प्रा. संतोष साळुंखे, प्रा. संतोष रणदिवे, प्रा.सतीश बनसोडे , प्रा अमोल तळेकर यांनी सहकार्य केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी केले.