आदल्यादिवशी जाहीर केलेले आरक्षण दुसऱ्या दिवशी बदलले ; ग्रामस्थांची नाराजी
प्रतिनिधी | करमाळा
तालुक्यात सध्या ग्रामपंचायत आरक्षण सोडत प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान सहा व सात तारखेला या सोडती काढण्यात आल्या. पण बिटरगाव (वां) येथील ग्रामपंचायत मधील आरक्षण ६ रोजी काढल्यानंतर सात तारखेला हि आरक्षण दुसऱ्यांदा काढण्यात आल्याने ग्रामस्थांनी या प्रक्रियेला विरोध केला आहे. दि ६ रोजी रोटेशन प्रमाणे ठेवण्यात आलेली जागा तशीच आरक्षित ठेवावी अशी मागणी अर्जाद्वारे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी विश्वासात न घेता आरक्षण सोडत काढल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बिटरगाव (वां) ग्रामपंचायत आरक्षण प्रक्रियेसाठी सहा जून रोजी संयुक्त सभा ग्रामसभा काढलेली होती. सदर ग्रामसभेत एकूण तीन प्रभाग व नऊ जागा आहेत. त्यापैकी अनुसूचित जागा ही प्रभाग क्रमांक एक मध्ये काढण्यात आली होती. परंतु दुसऱ्या दिवशी सात जून रोजी कोणत्याही प्रकारची ग्रामसभा न घेता प्रभाग क्रमांक दोन मधील लोकांना न कळवता आरक्षण सोडतीत बदल केलेला आहे असा आरोप महेंद्र दिनकरराव पाटील व इतर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे.
पाटील यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सहा जून रोजी झालेली ग्रामसभा यामध्ये आरक्षण सोडत ही प्रभाग क्रमांक एक मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव जागा रोटेशन पद्धतीने काढण्यात आली होती. तर सात जून रोजी ग्रामस्थांना न बोलावता चिट्ठी द्वारे आरक्षण सोडत काढण्यात आली व प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या प्रक्रियेला विरोध करीत सहा जून रोजी घेतलेल्या रोटेशन पद्धतीच्या निर्णय मान्य करीत प्रभाग एक मध्ये अनुसूचित जाती आरक्षण आहे तेच ठेवावे त्याबाबत परिशिष्ट १२ मध्ये इतिवृत्त तयार करून तहसीलदार यांना परिशिष्ट १३ नमुना बी तयार करावे तसेच प्रवर्गाचे आरक्षण चक्रअनुक्रमे फिरवून कायम करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सदर अर्जावर महेंद्र पाटील, रामचंद्र शेंडगे, दत्तात्रय सरडे आदींच्या सह्या आहेत.

दोन वेळा आरक्षण जाहीर केल्याचा अर्ज मिळाला आहे. पण अद्याप दुसऱ्या दिवशीची माहीती कार्यालयाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे खरच तसे घडलेय का किंवा नेमके काय झालय आत्ताच सांगु शकत नाही. तरी अर्जाची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही केली जाईल.
– विजयकुमार जाधव, निवासी नायब तहसिलदार, करमाळा.