परतीच्या पावसामुळे शेकडो एकर ऊसाला फटका
करमाळा – विशेष प्रतिनिधी
पावसामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागात दिसून येत आहे. शेकडो एकर क्षेत्रातील ऊसाला पावसाचा फटका बसून बहुतांशी ठिकाणी तोडणीला आलेला ऊस भुईसपाट झाल्याने संबंधित शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.


तालुक्याच्या पूर्व भागात गेले दोन दिवस जोराचा पाऊस झाला. या पावसात कोळगाव व परिसरातील ऊस जमिनीलगत लोळला आहे. त्यामध्ये तात्यासाहेब शिंदे, बापूराव निंभोरकर, शिवाजी साळूंखे, आप्पा साळुंखे, महादेव महाडिक, संतोष शिंदे, अनिल शिंदे, चरण चेंडगे, राजाभाऊ चेंडगे, गोरख चेंडगे, मच्छिंद्र चेंडगे, बप्पा आतकरे, विलास पाटील, सचिन पाटील, उद्धव शिंदे, उत्तम निंभोरकर आदिंसह इतरही काही शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसाला फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान कालच्या पावसाने तालुक्याच्या पश्चिम भागातील ऊस पट्ट्यातही ऊसाचे नुकसान झाले आहे. पावसाच्या तडाख्याने तोडणीला आलेला ऊस जमीनदोस्त झाल्याची माहिती ऊस उत्पादक गोकूळ साखरे (राजुरी) यांनी दिली आहे. तोडणीयोग्य असलेल्या आडसाली ऊस शेतीला पावसाचा फार मोठ्या प्रमाणात फटका बसला असून ऊसाचे आगार असलेल्या पश्चिम भागातील शेकडो एकर क्षेत्रावरील ऊस जमीनदोस्त झाल्याने ऊस उत्पादक हैराण झाल्याचे संजय साखरे यांनी सांगितले आहे.
पावसामुळे भुईसपाट झालेला ऊस साखर कारखान्यांनी लवकरात लवकर तोडणीसाठी नेऊन सहकार्य करावे, अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकरी करु लागले आहेत. त्याचवेळी पावसाच्या तडाख्यात ऊस जमीनदोस्त झाल्यामुळे आता नेमके काय करायचे, याबाबत कृषी विभागाने उपाययोजना सांगून दिलासा द्यावा. अशीही मागणी ऊस उत्पादकांमधून होत आहे.