तलाठ्याला मारहाण करुन पळुन जाणारे वाळु माफिया अद्यापही मोकाट ; कारवाईवर प्रश्नचिन्ह
करमाळा समाचार
करमाळा शहरात वाळू वाहतूक करत असताना ताब्यात घेतलेल्या ट्रकचालक व एका सहकाऱ्यांनी तलाठ्याला मारहाण करून टिपर पळून नेला आहे. याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन वीस दिवस उलटले वाळू माफिया मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी असा ? प्रश्न उपस्थित केला जात आहे.

करमाळा शहरातील जामखेड करमाळा रोडवर गॅस गोडाऊन नजीक पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा टिपर एमएच ४५ ए एफ 9344 यामधून वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती महसूल कर्मचाऱ्यांना मिळाली होती. यावेळी त्या ठिकाणी कर्मचारी पोहोचले व तपासणी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यामध्ये विनापरवाना वाळू असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर ट्रक चालकाला सोबत घेऊन एक तलाठी त्या गाडीत बसले व करमाळा तहसीलच्या दिशेने गाडी नेण्यास सांगितली. यावेळी ट्रक मध्ये बसलेल्या चालक व एका सहकार्याने संबंधित तलाठ्यास मारहाण केली व रस्त्यातच वाळू ओतून निघुन गेले आहेत. या संदर्भात करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन वीस दिवस उलटले तरी अद्याप एकही व्यक्ती ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले नाही. सरकारी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांन अशा पद्धतीने मारहाण करून पळून गेल्यानंतरही संशयीत सापडत नसतील तर सामान्य लोकांच्या तक्रारीचे काय होत असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.