हिंगणीतील गंभीर भाजलेल्या जखमीचा चार दिवसानंतर मृत्यु ; संशयीतांना अटक नसल्याने नाराजी
समाचार टीम
मागील पाच दिवसापुर्वी हिंगणी तालुका करमाळा येथील एकावर सोलापूर येथे उपचार सुरु होते. दुर्दैवाने संबंधित व्यक्तीचा मृत्यु झाल्याची माहीती मिळत आहे. पाच दिवस त्यांनी मृत्युशी झुंज देत असतानाही त्याला अंगावर पेट्रोल टाकुन मारणाऱ्या भावकीतील लोकांना पोलिसांनी पकडले नाही म्हणून मयताच्या निकटवर्तीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांना याबाबत विचारले असता संशयीतांचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, कानून बाबर व भावकीतील चंद्रकांत, अनिल व औदुंबर यांची शेती जवळजवळ आहे. कायम बांधावरून त्यांचे भांडण होत होते. सतत होणाऱ्या भांडणांचा राग मनात ठेवून सदरचा प्रकार घडल्याचे समोर आले होते. कानून बाबर यांचे लग्न झालेले नसल्याने ते एकटेच आपल्या छपराच्या घरात झोपलेले होते. त्या ठिकाणी रात्री अडीचच्या सुमारास चंद्रकांत बाबर, अनिल बाबर व औदुंबर बाबर हे तिघे आले त्यांनी पेट्रोल सारख्या उग्र वास येणाऱ्या ज्वलनशील पदार्थ हा कानून बाबर यांच्या अंगावर टाकून पेटवले अशी फिर्याद बाबर यांनी दिली होती.

त्यानंतर घरात पेटवल्यामुळे घराचे छप्पर त्यामुळे जळले व मोठ्या प्रमाणावर कानून बाबर हे भाजले होते. त्यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोलापूर येथे पाठवण्यात आले होते. पण मागील चार दिवसापासून बाबर यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर ते मध्यरात्री मयत झाले आहेत. पाच दिवस उलटले तरी अद्याप आरोपीना अटक नसल्याने पोलिसांवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.