चिमुकल्यांच्या ओठी विठुनामाचा गजर ; विठ्ठल रुक्मिणीचे ठिकठिकाणी स्वागत
करमाळा समाचार
कै. साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा क्रमांक एक यांच्यावतीने आज करमाळा शहरांमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने बाल दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे सदर दिंडीमध्ये मुलींनी विठ्ठल – रुक्मिणीच्या सह विविध संताच्या पेहरावात दिंडीत सहभाग नोंदवल्याने लक्षवेधक ठरली आहे. करमाळा शहरातुन प्रमुख रस्त्यावरुन सदरच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील प्रमुख चौकातून सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सदरची दिंडीही राशीनपेठ येथून पोथरे नाका या ठिकाणी पोहोचली. त्यानंतर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करीत दिंडी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे पुन्हा एकदा शाळेत पोहोचली. यावेळी विठ्ठलाच्या रूपामध्ये कुमारी आरोही घुमरे तर रुक्मिणीच्या रूपात पूर्वा घोलप यांच्यासह संतांच्या रूपात मुलींनी पेहराव केला होता.

सदरच्या दिंडी सोहळ्यामध्ये पालखी, तुळशी, झेंडे, गमचे, टोप्या, वाद्य व पेहराव यामुळे सदरची दिंडी हुबेहूब वाटत होती. ठीक ठिकाणी पालकांच्या वतीने सदर दिंडीचे स्वागत करण्यात आले व पालखी पूजन करण्यात आले. एक अनोखा उपक्रम घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना दिंडीचे महत्त्व पटणार आहे. शिवाय कशा पद्धतीने वारकरी विठ्ठला प्रति भक्ती भावाने लीन होतात महाराष्ट्राचा उत्सव साजरा करतात हे दिसून आले. सदर दिंडीचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक दयानंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षकांनी राबवले होते. सावंतगल्ली येथे नगरसेवक संजय सावंत यांच्यावतीने दिंडीचे स्वागत करीय अल्पोहार देण्यात आला महिलांनी विठ्ठल रुक्मीणीचे पुजन केले.