सुवर्णकार संघटनेच्या एकजुटीचा विजय ; ताब्यातील दोन व्यापाऱ्यांची सुटका – आजचा बंद रद्द
करमाळा समाचार –
सुवर्णकार संघटनेच्या भूमिकेनंतर दोन व्यापाऱ्यांना पोलिसांनी रात्री उशिरा सोडले आहे. अवैधरित्या कारवाई केल्याचे सांगत सुवर्णकार संघटनेच्या सर्व व्यापाऱ्यांनी जिल्ह्यातून एकजूट दाखवली त्याचाच परिणाम कोणतीही कारवाई न करता दोन्ही व्यापाऱ्यांना सोडण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. सदरचे व्यापारी जर संबंधित गुन्ह्यात नसतीलच तर त्यांना दोन ते तीन दिवस ताब्यात ठेवून पोलीस काय करत होते असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सराफ संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष फत्तेचंद रांका साहेब, शिरीष कटेकर साहेब, महावीर गांधी साहेब, सोलापूर जिल्हा अध्यक्ष गिरीश देवरमणी आणि जेऊर येथील अमोल शेठ महामुनी यांच्या प्रयत्नांना यश आले असून काहीही न घेता जेऊरच्या व्यापाऱ्यांची सुटका करण्यात आलेली आहे.

सोने चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सोलापूर हून जेऊर येथे आलेल्या पोलीसांनी शनिवारी जेऊर येथील सराफ व्यापारी गणेश पंडित आणि रवी माळवे यांना चौकशी करण्याच्या नावाखाली बेकायदेशीर अटक करून सोलापूर येथे आणण्यात आले होते असा आरोप करीत सुवर्णकार संघटना आक्रमक झाली होती. जिल्हा अधिक्षक यांना निवेदन देऊन बंद पुकारला होता पण रात्री उशीरा कारवाई न करता सोडल्याने आजचा बंद रद्द झाला आहे.