उमेदवार निवडीमध्ये देवी, बागल, चिवटेंचा वरचष्मा शिंदे समर्थकांना स्थान नाही ; युतीची चर्चा धुसर
करमाळा समाचार

करमाळा नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपा व राष्ट्रवादी (बागल व शिंदे) एकत्र येऊन नगरपरिषद निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरुवातीला होती. परंतु उमेदवार निवडीमध्येच संजयमामा शिंदे समर्थकांना जागा न मिळाल्याने संजयमामा शिंदे गटाकडून म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गट 13 जागांवर उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. तर भाजपने जाहीर केलेल्या यादीतून शिंदे समर्थकांना डावल्याचे दिसते. त्यामुळे आता भाजपा व राष्ट्रवादी युतीची चर्चा ही धुसरी झाल्याची दिसून येत आहे.
करमाळा नगरपरिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेने आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले असून सावंत गट व उद्धव ठाकरे शिवसेना समर्थक एकत्र आल्याचे दिसून आले. तर भाजपा व अजित पवार गट राष्ट्रवादी हे बागल व शिंदे यांच्या माध्यमातून एकत्र येतील अशा चर्चा व बैठकाही सुरू होत्या. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 21 जागांवर एबी फॉर्म आल्यानंतर सदरची चर्चा आता धुसर दिसू लागली आहे. याशिवाय राष्ट्रवादीने ही आपले उमेदवार दाखल करताना त्यांना एबी फॉर्म दिल्याने संजयमामा शिंदे गट ते 13 जागेवर स्वतंत्र लढण्याचा मानस करून असल्याचे दिसते.

सुरुवातीला कन्हैयालाल देवी यांच्या माध्यमातून शिंदे व बागल एकत्र येतील व शिंदे समर्थकांना योग्य सन्मान मिळून जागा मिळतील अशी शक्यता वाटत होती. परंतु नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून मोठ्या प्रमाणावर तडजोड झालेली दिसली व शिंदे समर्थकांना निवडीवेळी विचारात न घेतल्याचे प्रामुख्याने दिसून आले आहे. यामुळे भाजपा कोणालाही सोबत घेण्याच्या मूडमध्ये नसल्याचे दिसून येत आहे. भाजपाने सर्वच्या सर्व 21 जागांवर एबी फॉर्म दिलेले आहेत व स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी ही केली आहे.
कन्हैयालाल देवी शिंदे समर्थकांना स्थान देतील असे वाटत होते पण त्यांनीही नागरक संघटनेला पसंती दिली. संजयमामा शिंदे गटाला अचानक डावलल्यामुळे इतर तिघांकडे संपूर्ण पॅनल असला तरी शिंदे गटाकडे मात्र आता नगराध्यक्षपदाच्या उमेदवारही नाही आणि अर्धवट पॅनल असल्याचे दिसून येते. त्यामुळे शिंदे गट आता कोणता निर्णय घेतो याकडे लक्ष लागून राहिले आहे. तर या सर्व घडामोडीनंतर आता करमाळा नगर परिषदेची लढत एक प्रकारे चौरंगी स्वरूपाची होऊन बसली आहे. तीन नगराध्यक्ष जरी असले तरी संजयमामा शिंदे गटाच्या अर्ध्या पॅनल सह ही निवडणूक चौरंगी बघायला मिळू शकते.


